Join us

यंदा गहू शेतकऱ्यांना मालामाल करणार का? बाजारपेठेत असे आहे सध्या मागणी अन् भावाचं गणित..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 12:09 PM

गव्हाचा पेराही उशिरा झाला आहे. शिवाय, यंदा थंडी कमी राहिली आहे. दरम्यान बाजारपेठेत मिळतोय एवढा दर...

गत पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्याने जलसाठा घटला. तसेच अपेक्षित अशी थंडी जाणवली नाही. वातावरणातील बदलाचा गहू पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात निलंगा तालुक्यात गव्हाचे क्षेत्र घटले आहे. दरम्यान, बाजारपेठेत मागणी वाढल्याने यंदा चांगला दर मिळेल आणि शेतकरी मालामाल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गत जून महिन्यात पावसाने विलंबाने सुरुवात केली. जुलै महिन्यात तर सर्वात कमी पाऊस झाला. त्यामुळे परतीच्या पावसाकडे लक्ष लागून होते. परंतु, यंदा परतीच्या पावसानेही बरसात केली नाही. परिणामी साठवण क्षेत्रात जलसाठा कमी झाला. शिवाय, परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा लवकर कमी झाला. त्याचा परिणाम रबी हंगामातील पेरणीवर झाला आहे.

गहू अधिक पाणी लागणारे पीक आहे. या पिकास किमान आठ ते नऊवेळेस पाणी जमिनीत द्यावे लागते. गत पावसाळ्यात अल्प पाऊस आणि वाढत असलेल्या तापमानामुळे शेतकऱ्यांनी पुरेसे पाणी असल्यास गव्हाची पेरणी केली आहे. उर्वरित ठिकाणी ज्वारीचा पेरा झाला आहे. निलंगा तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १०५ हेक्टरने गव्हाचे क्षेत्र घटले आहे. तसेच गव्हाचा पेराही उशिरा झाला आहे. शिवाय, यंदा थंडी कमी राहिली आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती आहे.

थंडी गायब

यंदा अल निनोचा परिणाम वातावरणावर झाल्याने सतत ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे फारशी थंडी जाणवली नाही. गव्हाला पोषक असे वातावरण राहिले नाही.

उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना बसणार फटका

परतीचा पाऊस झाला नाही.त्यामुळे साठवण क्षेत्र घटले. शिवाय, थंडीची चाहुल उशिरा सुरू झाल्याने जमिनीतील ओलावा घटला, उपलब्ध पाण्यावर लवकर जमीन न भिजविता आल्याने पेरणी उशिरा करावी लागली. त्याचा फटका बसण्याची भीती आहे.

गव्हाचा भाव वाढणार की कमी होणार?

सध्या गव्हाला मागणी वाढली आहे. पण, उत्पादन घटल्याने दरवाढ झाली आहे. नवीन गव्हाला ३.३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.- अशोक थेटे, व्यापारी

पाण्याच्या कमतरतेमुळे यंदा उत्पादन घटले आहे. गव्हाचे यावर्षी मागणीही वाढली आहे. त्यामुळे गव्हाचे दर वाढण्याची शक्यता आहे. -सतीश देवणे, व्यापारी

सध्या गहू ३,३०० रुपयांवर

येथील बाजार समितीत नवीन गव्हाला ३ हजार ३०० रुपये प्रतिक्चिटल भाव मिळत आहे. जुन्या गव्हाला २ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

पाण्याअभावी यंदा पेरा घटला...

यंदा उशिरा पाऊस झाला आणि तो कमी झाला. शिवाय, परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा राहिला नाही. तसेच थंडीही अधिक जाणवली नाही. त्यामुळे गव्हाचा पेरा घटला. वातावरणातील बदलामुळे उत्पादन घटण्याची भीती आहे. अनिल शेळके, तालुका कृषी अधिकारी, निलंगा

२ हजार ११७ हेक्टरवर गहू

निलंगा तालुक्यातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहतात. त्यामुळे नदीपात्र परिसरात गव्हाचा पेरा होतो. यंदा तालुक्यात २ हजार ११७ हेक्टर क्षेत्रावर रब्बीतील गव्हाची पेरणी झाली आहे.३२ अंशांवर तापमान

यंदा उन्हाळ्याची तीव्रता फेब्रुवारी महिन्यातच 'जाणवू लागली आहे. सध्या कमाल तापमान ३२ ते ३४ अं. से. पर्यंत पोहोचले आहे.

टॅग्स :गहूबाजार