अलिबाग जिल्ह्यातील विविध भागांत मार्च अखेरीस पिकलेली जांभळे मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी दाखल होण्यासाठी तयार झाली आहेत.
त्यामुळे जांभळे विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठा कालावधी मिळणार असून, पहिल्या टप्प्यात चांगला भाव मिळण्याचा विश्वास उत्पादकांनी व्यक्त केला आहे.
शिवाय यंदा अपेक्षेपेक्षा लवकर जांभळांची चव चाखायला मिळणार असल्याने खवय्यांसाठीसुद्धा ही पर्वणी आहे. तसेच फळविक्रेत्यांनाही त्याचा आर्थिक लाभ होणार आहे.
जिल्ह्याच्या सागरी आणि डोंगरी भागात ऑक्टोबर महिन्यात जांभळाची झाडे मोहोरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात जांभूळ पक्त झाली.
काही गावरान झाडांसह बहाडोली जातींच्या कलमी झाडांनाही फळे लगडलेली दिसत आहेत. इतक्या लवकर फळे तयार झाल्याचा हा प्रकार क्वचितच पहायला मिळत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
चांगला भाव मिळण्याची आशा
यंदाचा हा हंगाम नेहमीपेक्षा लवकर सुरू झाल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची आशा आहे. या संधीचे सोने करण्यासाठी फळे काढणीचे योग्य व्यवस्थापन करण्यासह मार्केटिंग केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील हंगामात दोन किलो बहाडोली जातींच्या जांभळाच्या एका टोपलीला ७५० रुपये दर मिळाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
जांभळाला भौगोलिक मानांकन देण्याची मागणी
- यंदा हंगामाच्या प्रारंभी भाव वाढतील. शिवाय विक्रीसाठी अधिकच कालावधी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- या फळपिकाला यंदा निसर्गाने साथ दिली असून, जांभळाला भौगोलिक मानांकन मिळाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्केटिंगसाठी फायदा होईल, असा विश्वास जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा: PM Kisan : पीएम किसान योजनेचे हप्ते मिळणे बंद झालेत? पुन्हा सुरु करण्यासाठी करा हे उपाय