सद्य:स्थितीत पश्चिम वऱ्हाडातील कापसाला कमाल सात हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कापूस उत्पादनासाठी एकरी ५५ हजार ६५० रुपयांचा खर्च येतो. त्यात यंदा कापसाचा उतारा घटला असून, विभागात साधारणतः शेतकऱ्यांना एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन होत आहे. अशात पिकावरील खर्च वजा करता हाती काहीच उरत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र अमरावती विभागात दिसत आहे.
सध्या अमरावती विभागातील बाजारात कापसाला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी कापसाला विदर्भात काही दिवस प्रतिक्विंटल १३ ते १४ हजार रुपयांचे दर मिळाले होते. मागील वर्षीही ९ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव पोहोचले होते. कापसाला मिळणारा भाव पाहता शेतकऱ्यांनी यंदा कापसाचा पेरा वाढविला होता.
तथापि, यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच कापसाला अत्यल्प दर मिळत आहे. सुरुवातीला ८ हजारांपर्यंत असलेले कापसाचे दर आता सात हजारांच्या खाली घसरले आहेत. आधीच विविध नैसर्गिक आपत्तीने कापसाचे उत्पादन घटले असताना आता दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना कपाशीवर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे.
आवक वाढली, दर घसरले
सध्या कापसाची वेचणी अंतिम टप्प्यात असून, नवीन कापसाची बाजारात आवक वाढली आहे. अशातच बाजारात कापसाचे दर घसरले आहेत. बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाचे दर प्रतिक्चेिटल १२०० ते १५०० रुपयांनी कमी आहेत.
गतवर्षी कापसाला चांगला दर मिळाला. त्यामुळे मान्सूनला विलंब झाला असतानाही आम्ही उपलब्ध पाण्याच्या भरवशावर कपाशीची लागवड केली. तथापि, निसर्गाने घात केला असतानाच आता बाजारात कापसाचे दर पडल्याने केलेला खर्चही वसूल होणे कठीण आहे.
- सुधाकर इंगळे, कापूस उत्पादक शेतकरी
सध्या अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणी सुरू केली आहे. यामुळे मजूर टंचाई जाणवू लागली आहे. सध्या प्रतिकिलो ८ ते १० रुपये दर यानुसार मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे खर्चात अधिकच वाढ झाली असताना बाजारात दर पडल्याने हाती काहीच उरण्याची शक्यता नाही.
- आनंद तोतला, कापूस उत्पादक शेतकरी
आजचे कापूस बाजारभाव असे आहेत
बाजार समिती | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
१५ जानेवारी २४ | |||||
राळेगाव | --- | 5800 | 6500 | 6925 | 6800 |
उमरेड | लोकल | 721 | 6500 | 6900 | 6750 |
काटोल | लोकल | 175 | 6450 | 6850 | 6700 |
१४ जानेवारी २४ | |||||
वडवणी | --- | 43 | 6700 | 6850 | 6850 |
सोनपेठ | एच - ६ - मध्यम स्टेपल | 294 | 5700 | 6900 | 6800 |
कळमेश्वर | हायब्रीड | 1252 | 6700 | 6950 | 6800 |
वरोरा | लोकल | 2382 | 6400 | 6950 | 6700 |
वरोरा-खांबाडा | लोकल | 1050 | 6550 | 6910 | 6700 |
काटोल | लोकल | 250 | 6400 | 6850 | 6800 |
भिवापूर | वरलक्ष्मी - मध्यम स्टेपल | 500 | 6600 | 6850 | 6725 |