Join us

Tomato Market : टोमॅटोच्या लालीने शेतकरी चकाकणार; काय मिळाला दर वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 1:23 PM

शेतकऱ्यांना ३ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतका उच्चांकी दर मिळत आहे. वाचा काय मिळाले दर (Tomato Market)

(Tomato Market) :

करमाड :

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजार पेठ येथे गाढेजळगाव येथील शेतकरी नारायण ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दोन दिवसांपूर्वी ८५ कॅरेट टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. त्यांना प्रति किलो ४७ रुपये म्हणजे प्रति कॅरेट १२१० प्रमाणे उच्चांकी दर मिळाला.

करमाड येथील बाजार समितीत ४५ दिवसांपासून टोमॅटोची खरेदी सुरू असून आतापर्यंत तब्बल २ लाख ४० हजार कॅरेटची आवक झालेली आहे. संभाजीनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना ३ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतका उच्चांकी दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

राज्यात सर्वत्रच टोमॅटोची खरेदी प्रति कॅरेटप्रमाणे केली जाते; मात्र फक्त करमाड येथील बाजारपेठेत टोमॅटोची खरेदी प्रति किलोप्रमाणे केली जाते. याठिकाणी लिलाव पद्धतीने खरेदी होत असल्याने टोमॅटोला त्याच्या दर्जानुसार भाव मिळत आहे.

त्यामुळे करमाड येथील उपबाजार पेठेत जवळपास दीडशे किलोमीटर लांबून शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापारी देखील करमाड येथे खरेदीसाठी येत आहेत.

पूर्वी संभाजीनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना नागपूर, अमरावती, यवतमाळ येथील बाजारपेठेत टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जावे लागत होते. मात्र करमाड येथे खरेदी सुरू झाल्याने वाहतुकीचा खर्च, वेळ, पैसा यांची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याने शेतकरी समाधानी आहेत.

करमाड येथील बाजार समितीत लिलाव पद्धतीने टोमॅटोची खरेदी होत असून किलोप्रमाणे टोमॅटोचे वजन केले जाते. करमाडला खरेदी सुरू असल्याने सकाळी तोडलेला माल लगेच विक्रीसाठी आणता येतो, त्यामुळे टोमॅटोची क्वालिटी चांगली राहते, सर्वाधिक दर मिळाल्याचा आनंद आहे. -नारायण ज्ञानेश्वर ठोंबरे, शेतकरी, गाढेजळगाव

लिलाव पद्धतीने प्रति किलोप्रमाणे आम्ही खरेदी करत असल्याने दीडशे ते दोनशे किलोमीटरहून शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी आणत आहेत. रोज ७-८ हजारांपर्यंत कॅरेटची आवक करमाड येते सुरू असून शेतकऱ्यांना सर्वाधिक दर मिळत असल्याने आम्हाला देखील समाधान आहे. -राधाकिसन पठाडे, सभापती, संभाजीनगर बाजार समिती

 

टॅग्स :शेती क्षेत्रटोमॅटोबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतकरीशेती