दत्तात्रय पवार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील करंजखेड परिसरातील शेतकऱ्यांच्या टोमॅटोला सध्या प्रति कॅरेट (२० ते २२ किलो वजन) साडे पाचशे ते सहाशे रुपयांचा दर मिळत असून हे टोमॅटो शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरेदी करत व्यापारी त्याला नांदेडच्या बाजारात पाठवित आहेत. यामुळे सध्या शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
करंजखेड येथील शेतकरी सुखदेव भालचंद्र लेंबे यांनी आपल्या ३० गुंठे क्षेत्रात ४ बाय १ फूट अंतरावर शाहू गावरान जातीच्या टोमॅटोची लागवड केली.
विहिरीत पाणी कमी असतानाही रावसाहेब वळवळे यांच्या विहिरीतील पाणी घेत ठिबक सिंचनद्वारे त्यांनी टोमॅटो पीक जोपासले आहे. लागवडीपासून टोमॅटोचे उत्पन्न निघेपर्यंत ७५ ते ८० हजारांचा खर्च त्यांना आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी टोमॅटोला प्रति कॅरेट १०० रुपये ते २५० रुपये पर्यंत दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. मात्र सध्या टोमॅटोला दुप्पटपेक्षा अधिक भाव मिळत आहे. शनिवारी लेंबे व वळवळे यांचे टोमॅटो खरेदी करण्यासाठी तालुक्यातील बहिरगाव येथील व्यापारी शुभम राऊत आले होते.
त्यांनी या दोघांचे टोमॅटो खरेदी करून त्याला प्रति कॅरेट (२० ते २२ किलो वजन) साडे पाचशे ते सहाशे रुपयांचा दर दिला. हे टोमॅटो राऊत नांदेड येथील मार्केटमध्ये पाठवित आहेत. यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे. tomato market rate
पहिला तोडणी ३०, दुसरी ४५ आणि तिसऱ्या तोडणीत ९० कॅरेटचे टोमॅटोचे उत्पादन मला झाले आहे. आतापर्यंत १६५ कॅरेट टोमॅटेची विक्री करण्यात आली असून त्यातून एक लाखाचे उत्पन्न मिळाले. अजून तीन ते चार तोडण्या बाकी असून असाच भाव मिळाला तर ३० गुंठ्यात दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळू शकते. - सुखदेव लेंबे, शेतकरी.