राज्यातील बाजारसमित्यांमध्येटोमॅटोच्या (Tomato market price) आवकेत घट होताना दिसत आहे. सध्या सर्वाधिक आवक पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून होत असून पुणे जिल्ह्यातील आवक तुलनेने जास्त आहे. दोन आठवड्यापासून टोमॅटोच्या आवकेतील घट सुरू आहे.
राज्यात भाजीपाला उत्पादक शेतीकामात गुंतले असून काही भाजीपाला पिकांना पावसाचा फटका बसला आहे. परिणामी भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी दरात मोठी वाढ झाली आहे. टोमॅटो, गवारी, वाल शेंगा, कारले, शेवगा शेंगा, फुलकोबी, पालक, कोथिंबीर या भाज्यांनी शतक पूर्ण केले आहे. पावसामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्यांची आवक घटली असून नागपूर, गोंदिया, भंडारा येथील मंडईतून भाजीपाला येत असल्यामुळे भाव वाढले आहेत. पुढेही भाजीपाल्यांच्या व फळभाज्यांच्या दरात वाढ होण्याची माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली आहे.
दोन आठवड्यापूर्वी देशभरातील टोमॅटोच्या आवकेत ११ टक्के घट नोंदविली गेली होती. तर पुणे बाजारातील सरासरी बाजारभाव २४१७ रुपये प्रति क्विंटल असा होता. या आठवड्यात पुणे बाजारातील सरासरी किंमत वाढली असून ती वाणानुसार प्रति क्विंटल ३२०० ते ४ हजार रुपये इतकी आहे.
देशातील टोमॅटो उत्पादनात मागील हंगामात घट झाली होती. राज्यातील उत्पादनही सुमारे २ लाख टनांनी घटले होते. मागील वर्षाच्या २०४.२५ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा देशात टोमॅटोचे उत्पादन ४ लाख टनांनी वधारण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सन २०२३-२४ मध्ये टोमॅटोची उत्पादन २०८.१९ लाख टन होण्याची शक्यता आहे. (त्यात महाराष्ट्राचा आकडा दिलेला नाही, मात्र तेही वाढण्याची शक्यता आहे.)
या आठवड्यात राज्यातील बाजारांत टोमॅटोची सरासरी आवक ११ ते १४ हजार क्विंटल अशी राहिली, तर बाजारभाव कमीत कमी २ हजार ते सरासरी ३२०० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल राहिले. टोमॅटोची नवीन लागवड राज्यात सुरू झाली असून अनेकांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान आज दिनांक २६ जून रोजी सकाळच्या सत्रात खेड-चाकण बाजारसमितीत टोमॅटोची १५२ क्विंटल आवक झाली. कमीत कमी दर ३५०० तर सरासरी ४ हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला. नाशिक बाजारसमितीत काल दिनांक २५ जून रोजी हायब्रीड टोमॅटोला सरासरी १५०० रुपये दर होता. आवक घटत असल्याने आगामी काळात टोमॅटोचे बाजारभाव वधारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पावसाळ्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांच्या दरात वाढ झालेली आहे. मोठ्या मंडईतून भाजीपाला विकत घ्यावा लागत आहे. टोमॅटोसह अन्य भाज्यांच्या दरात वाढ झाली असून आवक घटल्यास आणखी काही दिवस दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
- महेश शेंडे, भाजी विक्रेते, कोरची, गडचिरोली
आजचे टोमॅटो बाजारभाव (रुपये/ क्विंटल)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
26/06/2024 | ||||||
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 65 | 2500 | 5000 | 4000 |
पुणे | लोकल | क्विंटल | 1332 | 2000 | 4000 | 3000 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 10 | 3500 | 3500 | 3500 |
कराड | वैशाली | क्विंटल | 105 | 2500 | 3500 | 3500 |