गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत
सुमारे १ महिन्यापूर्वी २०० रुपये किलो असलेल्या टोमॅटो आज ८ सप्टेंबर २३ रोजी चक्क दोन रुपये किलो विकला जात आहे.अशातही शेतकरी शेतातील चिखल तुडवत पाण्यापावसात टोमॅटोची खुडणी करत आहे मात्र चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा आता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करत आहे. कारण टोमॅटोला . प्रति किलो दोन रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टमाट्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्ह्यातून टोमॅटो हा टॉमेटो गुजरात, हरियाणा,हैदराबाद, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, श्रीलंका यासारख्या भागात टोमॅटो पाठवले जात असतात. टमाट्याचे दर पडल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड,लासलगाव, दिंडोरी,चांदवड या तालुक्या मधून तसेच ग्रामीण मधील भागांमध्ये टमाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते. या भागातील शेतकऱ्यांना भाव पडल्यामुळे मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.
मार्केटमध्ये भाव नसताना मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या टोमॅटोचे काय करावे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. लाखो रुपये खर्चून टोमॅटोचे पीक घेतले असून, सध्याच्या भावात मजुरी सुटणे अवघड असल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. मधल्या काळात टोमॅटोमुळे शेतकरी लखपती झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या होत्या, आता कमी दरामुळे लाखो रुपयांचे भांडवल खर्च झालेल्या टोमॅटो शेतकऱ्यांना रडकुंडीला आणत आहे.
लाखोंचा खर्च गेला वाया
मोहाडी येथील हेमंत पाटील या शेतकऱ्याची दोन एकर टमाट्याची शेती आहे. त्यांनी पिकासाठी एकरी दीड लाख रुपये खर्च केला. तीन लाख रुपये लागवड खर्च आहे काढणीचा खर्च वेगळा आहे. काढण्याचा खर्च सुद्धा आता परवडणार नाही अशी स्थिती निर्माण झाली त्यामुळे त्यांनी पिंपळगाव बाजार समितीतच आपले दर्जेदार टोमॅटो फेकून देत शासनाचा निषेध नोंदवला होता, तर आता पिंपळगाव बसवंत येथील विलास बनकर यांची 4 एकर शेती आहे. यात अडीच एकरवर त्यांनी तीन ते साडे तीन लाख खर्च करून टमाट्याची लागवड केली होती. आज टोमॅटो काढणीला सुद्धा ही परवडत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. घरच्या जनावरांना टोमॅटो खाऊ घालण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे
पाऊस आला मात्र शेतमालाचा भाव गेला
गेल्या अडीच महिन्यापासून पाऊस सुरू होऊन देखील पावसाचा एक थेंब पडत नव्हता त्यामुळे कशीबशी शेती टँकरच्या पाण्याने शेतकऱ्यांनी पिकवून दोन पैसे मिळाले होते मात्र पाऊसही आता समाधानकारक पडू लागला आहे मात्र शेतमालाचे भाव कवडीमोल मिळत असल्याने पाऊस आला मात्र भाव गेला अशी स्थिती निर्माण झाली आहे.