नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी टोमॅटोची विक्रमी ३११ टन आवक झाली आहे. आवक जवळपास दुप्पट झाल्यामुळे बाजारभाव निम्म्यावर आले आहेत.
गत आठवड्यात ३५ ते ६० रुपयांना विकले जाणारे टोमॅटोचे दर १५ ते ३५ रुपयांवर आले आहेत. फरसबी व काकडीचे दरही नियंत्रणात असून, उर्वरित सर्व भाज्यांची तेजी कायम आहे.
राज्यभर सुरू असलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. आवक कमी असल्यामुळे जुलैमध्ये बहुतांश सर्व वस्तूंचे दर वाढले होते. सर्वाधिक दरवाढ टोमॅटोची सुरू होती.
घाऊक बाजारात गत आठवड्यात ३६ ते ६० रुपये किलो दराने टोमॅटोचे विक्री होत होती. शनिवारी बाजारभाव ७० रुपयांवर पोहोचले होते. किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १२५ रुपये दराने टोमॅटोची विक्री होत होती.
३ हजार २८५ टन भाजीपाल्याची आवकसोमवारी बाजार समितीमध्ये ६९२ ट्रक, टेम्पोमधून ३२८५ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ४९ हजार जुडी पालेभाज्यांचाही समावेश आहे. पुणे, नाशिक, सातारासह विविध जिल्ह्यांतून आवक होत आहे.
तर पुन्हा दर उसळणारसोमवारी बाजार समितीमध्ये एकाच दिवशी ३११ टन आवक झाली आहे. अचानक आवक वाढल्यामुळे बाजारभाव घसरले आहेत. आवक अशीच सुरू राहिली तर यापुढेही दर नियंत्रणात राहू शकतात. आवक कमी झाली तर पुन्हा दर उसळी घेतली, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. टोमॅटोबरोबर फरसबी, काकडीचे दरही कमी झाले आहेत. यासोबत इतर भाज्यांचे दरही वाढले आहेत.