लाल रंगाच्या टोमॅटोने चांगलेच डोळे वटारले आहेत. देशातील अनेक भागात टोमॅटोचे दर १५० रुपये किलोच्या वर गेले आहेत. दर कमी होण्यास काही काळ वाट पाहावी लागेल. अशा स्थितीत टोमॅटोची रेशनच्या दुकानातही विक्री सुरू झाली आहे. तामिळनाडूमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम बंगाल सरकारनेही दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत.
केवळ टोमॅटोच नव्हे तर हिरवी मिरचीही महाग झाली आहे. तसेच अनेक भाज्यांच्या किमतीत साधारणत: ५० ते ७० टक्के दरवाढ झालेली आहे. काही आठवड्यांपूर्वी टोमॅटो ४० ते ५० रुपये किलो या दराने विकला जात होता. आता हे दर १५० रुपये किलोपेक्षा जास्त झाले आहेत. याशिवाय अनेक भाज्याही महागल्या आहेत.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे दोन आठवड्यात टोमॅटोसह इतर भाजीपाल्याचे नवे पीक बाजारात येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच सामान्यांना दिलासा मिळू शकेल. चेन्नईत स्वस्त धान्याच्या दुकानात ६० रुपये प्रतिकिलो या दराने टोमॅटो विक्री सुरु झाली आहे. ८२ रेशन दुकानांच्या माध्यमातून टोमॅटोची विक्री सुरु करण्यात आली आहे. याशिवाय कोइम्बतूर, सालेम, इरोड, तिरुनेलवेली, वेल्लोर इत्यादी ठिकाणी यापूर्वीच याची अंमलबजावणी झाली आहे.
सरकारने रायतू बाजारच्या माध्यमातून ५० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विक्री सुरु केली आहे. राज्य सरकारने स्वतःच्या किरकोळ विक्री केंद्र सुफल बांगला'च्या माध्यमातून भाजीपाल्याची योग्य दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षी दक्षिण आणि मध्य भारतात मान्सूनचे उशिरा आगमन झाले. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे शहरांमध्ये पुरवठा घटला आहे. टोमॅटो, हिरवी मिरचीशिवाय कांदा, लसूण, कोथिंबीर, अद्रक इत्यादींचेही दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.