गेल्या आठवड्यापासून टोमॅटो व हिरव्या मिरचीचे दर वाढते आहे. शनिवारी धाराशीव येथे टोमॅटो ३०, तर हिरवी मिरची ६० रुपये किलोने विक्री झाली. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याचे क्षेत्र घटले आहे. उपलब्ध पाण्यावर केलेल्या भाजीपाल्याला एप्रिल, मे मधील उष्णतेमुळे फलधारणा घटली आहे.
धाराशिव येथील देशपांडे स्टॅडजवळील भाजी मंडईतील काही किरकोळ विक्रेते म्हणाले की, आवक घटल्याने गेल्या आठवड्यात जे टोमॅटो १० रुपये किलोने विकले जात होते, ते सध्या ३० रुपयांनी विकले जात आहेत. मिरची, टोमॅटोचे भाव फक्त मोठ्या शहरात नव्हे, तर ग्रामीण भागातही वाढत आहेत.
लातूर, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातही बाजार समितीत शनिवारी लिलाव काढण्यात आले. त्यामध्ये टोमॅटो व हिरव्या मिरचीचे दर वाढलेलेच दिसून आले. बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे की, काही महिन्याभरापूर्वी मिरचीचे दर कमी होते, तर टोमॅटो ५ ते १० रुपये किलोने विकले जात होते. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना भाजीपाला घेता येत नाही.
पाण्याअभावी काही शेतकऱ्यांनी मिरचीसह टोमॅटोचे प्लॉट मोडून जमिनीची मशागत केली. परिणामी, आवक घटली असून भाव वाढत आहेत. काही कृषी तज्ज्ञांच्या मते एप्रिल, मेमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे टोमॅटोवर परिणाम झाल्याचे सांगितले. केवळ मिरची, टोमॅटोच नाही, तर भाजी मंडईत इतर भाज्यांचेही दर वाढत आहेत. आगामी काही दिवस टोमॅटोसह इतर भाज्या महागच राहण्याची शक्यता आहे.
यंदा एप्रिल, मेमध्ये अनेक वेळा उष्णतेची लाट ओढवली. यामुळे पिकांवर परिणाम झाला असून फुलगळती मोठ्या प्रमाणात झाली. उष्णतेमुळे फलधारणा अल्प प्रमाणात होते. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक येत असल्याने पीक घेणे सोडून दिले. - नकुल हारवाडीकर, कृषी शास्त्रज्ञ, तुळजापूर विज्ञान केंद्र.
भाजीपाल्याला चार दिवसाला पाणी लागते. यंदा दुष्काळ असल्याने मार्च महिन्यातच विहीर, कूपनलिकांनी दम तोडला. सध्या पिण्यापुरते पाणी मिळते. लाखो रुपये खर्च करून लावलेल्या फळबागांना जोपासणे अवघड झाले आहे. उष्णतेमुळे आंबे, लिंबू, सीताफळाचे पाने करपत आहेत. - सुरेंद्र झांबरे, शेतकरी.