रोजच्या आहारामधील समावेश असलेल्या असलेल्या टोमॅटोला राज्यभर चांगला दर मिळू लागल्याने ज्यांच्याकडे टोमॅटो आहे, असे शेतकरी टोमॅटोच्या वधारलेल्या दराने समाधानी आहेत. एप्रिल व मे मध्ये बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना रडवणाऱ्या टोमॅटोला विक्रमी दर मिळू लागला आहे. दरम्यान पुढील काही दिवस टोमॅटोचे दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यापायांनी व्यक्त केला आहे.
पाऊस सुरू झाल्यापासून राज्यभर भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊन बाजारभाव वाढू लागले आहेत. बाजारभाव वाढलेल्या वस्तूंमध्ये टोमॅटोचाही समावेश आहे. एक महिन्यात दर पाच पट वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये बाजारभाव ८० ते १०० पर्यंत पोहोचले आहेत. भाव वाढल्यामुळे शेतकरी खूश असून दुसरीकडे ग्राहकांना मात्र भाववाढीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.
पावसामुळे टोमॅटो खराब होत असल्यामुळे किरकोळ मार्केटमध्ये ७० ते १०० रुपये दराने विक्री होत आहे. बुधवारी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ११७९ टन टोमॅटोची आवक झाली आहे. सर्वाधिक ५०४ टन आवक जुन्नर- नारायणगाव बाजार समितीमध्ये झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये २३१ टन आवक झाली आहे.
राज्यात टोमॅटोला सर्वाधिक भाव श्रीरामपूर बाजार समितीमध्ये मिळाला आहे. याठिकाणी किमान ३० ते कमाल ११० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री झाली आहे. सोलापूरमध्ये ९ ते ८० रुपये, औरंगाबादमध्ये ५० ते ७० रुपये भाव मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटो ३५ ते ४५ रुपये किलो दराने टोमॅटो विकला गेला.