शासनाने कापसाला हमीभाव सात हजार रुपये घोषित केला आहे, मात्र पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात व्यापारी अडल्या नडलेल्या शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षाही कमी भावाने कापूस खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मागील वर्षी काही वेळ कापसाला नऊ हजारांपर्यंत भाव मिळाला होता, मात्र नंतर तो घसरला, त्यानंतर अद्यापही भाववाढ झालेली नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे मिळेल त्या भावात कापूस विक्री करावा लागत असून यामुळे व्यापाऱ्यांचे चांगलेच फावत आहे.
अगोदरच पावसाची दडी व नंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे कपाशीचे अतोनात नुकसान झाले. यामुळे उत्पादनात मोठी घट आली. त्यात भावातही वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. शासनाने कपाशीला ७ हजार २० रुपये हमीभाव जाहीर केला आहे; पण खासगी व्यापारी सहा ते साडेसहा हजार रुपये भावात कापूस खरेदी करीत आहेत. नुकताच अवकाळी पावसात ओला झालेला कापूस तर आणखी कमी भावात खरेदी केला जात आहे. मागील वर्षीच्या कापसाच्या गठाण जीनिंग मालकांकडे पडून आहेत. त्यातच गुजरातेत मागणी नसल्याने भाव कमी मिळत आहे, त्यामुळे कापसाचे दर घसरलेले असल्याची माहिती पाचोडचे व्यापारी संजय सेठी यांनी दिली.