सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ दिवसांपूर्वी कांद्याचा दर तब्बल साडेआठ हजारांच्या घरात पोहोचला होता. ऐन दिवाळीत कांद्याचा वांदा होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने निर्यातीवर कर वाढविला. त्याचा परिणाम मार्केटवर झाला आहे आणि दर कोसळला.
दिवाळीत दर दहा हजारांच्या घरात जाईल, अशी आशा होती. व्यापारीही तसेच बोलत होते. मात्र, मागील आठ दिवसांत दर सहा हजारांतच अडकला आहे. सरासरी दर ही तीन हजार ते चार हजारांमध्ये राहिला आहे. सोलापूरबाजार समितीत मागील दहा महिन्यांत जवळपास ७० हजारांपेक्षा अधिक ट्रक कांद्याची विक्री झाली आहे. त्यातून सुमारे सहाशे कोटींची उलाढाल झाली आहे. मात्र, मागील पंधरा दिवसांपूर्वी कांद्याचा दर पाच हजारांच्या आत होता. मात्र, दक्षिणेकडील राज्यातून मागणी वाढल्याने आणि बंगळुरू मार्केटमध्येही कांद्याची आवक कमी असल्याने दर वाढला.
शेतकऱ्यांना फटका
आवक कमी झाल्यानंतर दर साडेआठ हजारांमध्ये पोहोचला होता. तेव्हा व्यापाऱ्यांनी यंदा शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत, असे बोलत होते. मात्र, अचानक निर्यातीवर कर वाढल्याने दर कोसळला आहे. मागील आठवड्यात एखादा दिवस वगळता सोमवारपासून ते शनिवारपर्यंत सहा हजारांचा दर राहिला आहे.
कच्चा माल वाढल्यानेही दर कमी
अचानक दर आठ हजारांपेक्षा अधिक गेल्यानं शेतातील कांदा काढण्यास सुरुवात केली आहे. कच्चा माल भरुनच मार्केटमधून आणल्याने त्या मालाला दर मिळाला नाही. कारण, कच्चा माल भरल्यावर टिकत नाही. त्यामुळे व्यापारी दर पाडून मागतात. त्याचा शेतकऱ्याला फटका बसतो. शेतकऱ्यांना कांदा काढल्यावर वाळवूनच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.