सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील लाल तुरीला प्रतिक्विंटल उच्चांकी १० हजार रुपयांचा दर मिळाला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार, दि.२९ नोव्हेंबर रोजी २५ क्विंटल तुरीची आवक झाली होती.
तिला किमान ८,७०० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर शनिवारी तुरीला या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी भाव मिळाला. १० हजार ३० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे दर मिळाला. आजही तुरीच्या दराने '१० हजार' रुपयांचा टप्पा कायम ठेवला आहे.
गतवर्षी दुष्काळी स्थितीमुळे तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. त्यामुळे तुरीचा दर प्रतिक्विंटल १३ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने किरकोळ बाजारात डाळीचा भाव गगनाला भिडला होता. बाजारात तुरीची आवक कमी असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.
शेतकऱ्यांनी माल वाळवून आणावा
- सध्या तुरीला १० हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी गडबड करून माल विक्रीसाठी आणतात.
- कच्चा आणि खराब माल आल्यानंतर दर पडतो. त्यात नुकसान शेतकऱ्यांचेच होते.
- शेतकऱ्यांनी रास केल्यानंतर तूर व्यवस्थित वाळवून आणल्यास चांगला दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड करू नये, असे आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
उडीद अन् मुगाला असा आहे भाव
दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजारात २९ नोव्हेंबर रोजी उडदाला ४ हजार १०० रुपये क्चिटलमागे भाव मिळाला, तर हिरव्या मुगाला ५ हजार रुपये, असा भाव मिळाला, तर ३० नोव्हेंबर रोजी उडदाला ६,६०० दर मिळाला. सद्यःस्थितीत उडीद दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे.
यंदा तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, पीक फुलोऱ्यामध्ये आल्यानंतर पाऊस थांबला होता. त्यामुळे यंदा तुरीच्या उत्पादनात घट झाली आहे. सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. यंदाच्या हंगामात दर टिकून राहण्याची अधिक शक्यता आहे. - बसवराज इटकळे, भुसार व्यापारी, सोलापूर