Tur Bhajar Bhav :
वाशिम : यंदाच्या हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होत असल्याने शेतकरी संभ्रमात पडले असतानाच आता तुरीच्या दरातही घसरण सुरू झाली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी १३ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचलेले तुरीचे सरासरी दर आता ९ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलच्याही खाली आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत ११ हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात असलेले तुरीच्या दरात घसरण होत आहे. मागील आठवडाभरात तुरीच्या दरात साधारणतः पाचशे ते सातशे रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक घसरण झाली.
सद्यःस्थितीत बाजार समित्यांत तुरीला सरासरी ९ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. तुरीच्या दराने मार्च, एप्रिल महिन्यांत १३ हजारांचा टप्पा गाठला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामात तुरीला चांगले दर मिळण्याची अपेक्षा होती.
तथापि, आता तुरीचा हंगाम दीड-दोन महिन्यांवर आला असताना तुरीच्या दरात घसरण सुरू झाल्याने जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरत असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यातही वाढले तुरीचे क्षेत्र !वाशिम जिल्ह्यात सरासरी ५८ हजार ६१० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी अपेक्षित असताना ६६ हजार ४३६ हेक्टर क्षेत्रावर यंदा तुरीची पेरणी झाली आहे. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा तुरीच्या क्षेत्रात जवळपास आठ हजार हेक्टरने वाढ झाल्याचे दिसत आहे.
राज्यात तुरीच्या क्षेत्रात एक लाख हेक्टरची वाढ !राज्यात यंदाच्या खरीप हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत तुरीच्या क्षेत्रात १ लाख हेक्टरपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंतच राज्यात १२ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती, तर मागील वर्षी तुरीचे क्षेत्र ११ लाख हेक्टरपेक्षा थोडे अधिक होते.
जिल्ह्याच्या मुख्य बाजारपेठेतील तुरीचे दर
तालुका | दर |
कारंजा | ९,६७५ |
मानोरा | ९,८०० |
रिसोड | ९,८२० |
मंगरुळपीर | ९,८५५ |
वाशिम | ९,९९० |