Join us

Tur Kharedi : शासकीय केंद्रांकडे तूर उत्पादकांनी 'या' कारणामुळे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:46 IST

Tur Kharedi : खुल्या बाजारात तुरीचे दर पडल्याने शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने तूर खरेदी (Tur Kharedi) सुरू केली. तथापि, या खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे.

वाशिम : खुल्या बाजारात तुरीचे दर पडल्याने शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने तूर खरेदी  (Tur Kharedi) सुरू केली. तथापि, या खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. 

त्यात वाशिम जिल्ह्यात शासकीय केंद्रांमध्ये १९ मार्चपर्यंत एकाही शेतकऱ्याने तुरीची विक्री केली नसल्याचे माहितीतून स्पष्ट झाले आहे. राज्यात यंदाच्या हंगामात १२ लाख टन तुरीचे उत्पादन झाले. केंद्र सरकारने १०० टक्के तूर खरेदीला  (Tur Kharedi) परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने मात्र, पहिल्या टप्प्यात २ लाख ९७ हजार टन तुरीची खरेदी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एकूण उत्पादनाच्या केवळ २५ टक्केच खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे परिणामी मोठ्या प्रमाणात शेतकरी तूर खरेदीपासून  (Tur Kharedi) वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हमीभावाने तूर खरेदीसाठी शासनाने राज्यभरात एनसीसीएफ आणि नाफेडच्या ३१५ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. ९० दिवस तूर खरेदी  (Tur Kharedi) करण्यात येणार आहे. १२ लाख टन तुरीचे उत्पादन राज्यात यंदाच्या हंगामात झाले.

वाशिममध्ये नोंदणी झाली, खरेदी नाही!

प्रत्यक्षात राज्यात तुरीची खरेदी अद्यापही संथ गतीने सुरू आहे. त्यात वाशिम जिल्ह्यात नोंदणी करूनही अद्याप तूर खरेदीच होऊ शकली नाही.

जिल्ह्यात २ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

वाशिम जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी १५ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांतर्गत १८ मार्चपर्यंत २ हजार ३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीही केली. तथापि, अद्याप एकाही केंद्रात शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणली नाही.

चुकाऱ्यांना होणाऱ्या विलंबाचा परिणाम

शासकीय केंद्रांमध्ये शेतमाल विकल्यानंतर शेतकऱ्यांना वेळेत चुकारा मिळत नाही. यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते.

सद्यस्थितीत शेतकऱ्यांना पीक कर्जाची फेड, घेण्या देण्याचे व्यवहार तसेच खरीप हंगामाच्या तयारीसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात खुल्या बाजारातच तुरीची विक्री करीत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक किती; सध्या काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतकरीमहाराष्ट्र