शेतकऱ्यांजवळ साठवणुकीचा माल नसल्याने बाजार समित्यांमध्ये आवक रोडावलेली आहे. नवा शेतमाल निघायला सहा महिन्यांचा अवधी आहे. अशा परिस्थितीत मागणी वाढल्याने तुरीला शुक्रवारी विक्रमी १२,१४१ रुपये व हरभऱ्यालाही उच्चांकी सहा हजार रुपये भाव मिळाला आहे.
गतवर्षीच्या हंगामात साठवणूक केलेला शेतमाल आता शेतकऱ्यांजवळ शिल्लक नाही. गतवर्षी अतिपावसाने किमान ५० हजार हेक्टरमधील तूर पिकाचे मोठे नुकसान झाल्याने सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे व सार्वत्रिक तूर पिकाची अशीच स्थिती असल्याने तुरीची मागणी वाढताच भावदेखील कडाडले आहेत.
याउलट हरभऱ्याला हंगामाच्या सुरुवातीपासून हरभऱ्याला ५३३५ रुपये हा हमीभावदेखील मिळालेला नाही. खासगीत शेतकऱ्यांची लूट होत असल्याने शासनमान्य दराने साडेपाच लाख क्विंटल तुरीची खरेदी नाफेडच्या १६ केंद्रांवर करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ आता हरभरा नाही. त्यामुळे बाजार समितीत आवक मंदावली आहे. अशा परिस्थितीत मागणी वाढल्याने हरभऱ्याचेही दर कडाडले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात हरभरा डाळीचे दरातही दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे.
तूर वाढल्याने डाळीचीही झाली दरवाढ
महिनाभरापासून तूर क्विंटलमागे ११ हजार रुपयांवर असल्याने डाळ देखील किलोमागे १४० ते १५० रुपयांनी विकली गेली. आता १२ हजारांवर भाव मिळाल्याने डाळदेखील १५० ते १६५ रुपयांवर पोहोचली आहे. हरभऱ्याची डाळदेखील किलोमागे १० ते २० रुपयांनी वाढली आहे.
तुरीचे बाजारभाव (रु./क्विं.)
१९ ऑगस्ट १०६०० ते ११३००
२३ ऑगस्ट १०५०० ते ११२५०
२५ ऑगस्ट १०५०० ते ११०००
२८ ऑगस्ट १०५०० ते ११३९९
३० ऑगस्ट १०७०० ते ११५२५
१ सप्टेंबर ११५०० ते १२१४१
शेतकऱ्यांजवळ आता साठवणूक केलेली तूर नाही, अशीच हरभऱ्याची स्थिती आहे. बाजार समित्यांमध्ये आवक कमी झाल्याने मागणी वाढली व दरवाढ झाली आहे. - पवन देशमुख कृषीतज्ज्ञ, बाजार समिती.