यवतमाळ : हंगामातील तूर खरेदीसाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील १४ केंद्रांना मंजुरी दिली आहे. या केंद्रांवर हमी दरानुसार (Guarantee Centers) तुरीची खरेदी होणार आहे. तत्पूर्वी तुरीच्या विक्रीकरिता शेतकऱ्यांना या केंद्रांवर ऑनलाइन (Online) पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे.
खुल्या बाजारात तुरीचे (Tur) दर घसरले आहे. ६ हजार ८०० रुपये क्विंटल दराने तुरीची खरेदी (Tur Procurment) होत आहे. या परिस्थितीत हमी केंद्रांवरील तूर खरेदी शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरणार आहे. यावर्षी मार्केटिंग फेडरेशन (Marketing Federation) आणि विदर्भ को ऑप. मार्केटिंग फेडरेशन (Vidarbha co op. Marketing Federation) खरेदी करणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
तुरीचा हमी दर ७,५५० वर
हमी दरानुसार तुरीला ७ हजार ५५० रुपये क्विंटलचे दर आहे. सध्या दराच्या तुलनेत हे दर क्विंटलमागे ५०० रुपयाने अधिक आहेत. यामुळे शेतकरी या केंद्रांवर तूर विक्रीसाठी गर्दी करण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेता राज्य शासनाने मंजूर केंद्रांवर २४ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन (Online) नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पेऱ्यानुसारच होणार खरेदी
शेतकऱ्यांना मंजूर केंद्रावर सातबारा, आठ अ, बँक पासबुक, आधार कार्ड याची आवश्यकता असणार आहे. ऑनलाइन पीक पेऱ्यानुसार शेतकऱ्यांना तुरीची खरेदी या केंद्रांवर केली जाणार आहे.
असे आहेत मार्केटिंग फेडरेशनचे केंद्र जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनचे सात केंद्र आहेत. यात मारेगाव, पांढरकवडा, झरी, पुसद, दिग्रस, बाभूळगाव, दारव्हा या केंद्रांचा यात समावेश आहे. या ठिकाणी खरेदी विक्री संघ अथवा बाजार समितीमध्येही ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विदर्भ को-ऑप मार्केटिंग करणार सात केंद्रावर खरेदी
विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यवतमाळ, उमरखेड, वणी, मुकूटबन, घाटंजी, राळेगाव आणि कळंब या केंद्रांवर तुरीची खरेदी करणार आहे. त्याची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी महिनाभरात ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना तूर विक्री करता येणार आहे. मर्यादित तारखेमध्ये नोंदणी न केल्यास इतर शेतकऱ्यांना हमी केंद्रावर तुरीची विक्री करता येणार नाही.
आर्णीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशनला आर्णी केंद्रावरील तूर खरेदीकरिता परवानगी मिळाली आहे. या ठिकाणी केंद्र सुरू करण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.