Join us

तुरीने वाढवली हुरहुर, साडेअकरा हजारांचा मिळतोय दर; आणखी वाढणार काय भाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:05 AM

शेतकऱ्यांत मात्र संभ्रमाचे वातावरणः जिल्ह्यातील बाजारसमित्यांमध्ये कमीअधिक आवक

वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यात तुरीला सद्यस्थितीत सरासरी ११ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. दरात आणखी वाढ होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी वर्तविली आहे. तथापि, तुरीच्या दरात सतत चढउतार होत असल्याने शेतकरी संभ्रमात पडले असून, बाजार समित्यात तुरीची आवकही कमीअधिक होत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीचे दर १२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत चढले होते. त्यामुळे तुरीचे दर १३ हजारांचा टप्पाही ओलांडणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

देशांतर्गत तुरीचा अल्प साठा, यंदा घटलेले उत्पादन आणि तुलनेत डाळींची वाढलेली मागणी ही तुरीचे दर वाढण्यामागील कारणे होती. आता मात्र वाशिम जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश बाजारांमध्ये तुरीचे दर घसरले आहेत. सोमवार २९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीला किमान ९ हजार ५०० ते कमान ११ हजार ८०५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले.

तर, तुरीचे सरासरी दर साडेअकरा हजार रुपये प्रतिक्विंटलच्या घरात आहेत. तुरीच्या दरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चढउतारामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत.

काही शेतकरी तुरीच्या दरात घसरण होण्याच्या भीतीपोटी तुरीची विक्री करीत आहेत, तर काही शेतकरी दरात वाढ होण्याच्या अपेक्षेने तूर साठवून ठेवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीची आवकही कमीअधिक होत असल्याचे चित्र दिसत आहे. 

कारंजात दर जास्त आवक कमी

सोमवारी जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत कारंजा बाजार समितीत तुरीला सर्वाधिक ११ हजार ८०५ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे कमाल दर मिळाले. तथापि, या बाजार समितीत केवळ ८०० क्चिटल तुरीची आवक झाली होती. तर वाशिम बाजार समितीत तुरीला कमाल ११ हजार ५२६ क्विंटलपर्यंतचे दर मिळाले असताना या बाजार समितीत ३ हजार ५०० क्विंटल तुरीची आवक झाली होती.

कुठे किती कमाल दर (प्रती क्विंटल)

वाशिम - ११५२६ 

कारंजा - ११,८०५

मानोरा - ११,६००

दरात वाढ होणार

◆ तुरीला असलेली वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा लक्षात घेता देशातील महत्वाच्या बाजार समित्यात तुरीचा सरासरी ११ हजार ३०० रुपयांच्यावरच आहे.

◆ त्यातच घटती आवक आणि चांगला उठाव, या कारणांमुळे तुरीच्या भावातील तेजी कायम राहणार असून, पुढील काळात तुरीचे दर वाढण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

◆ त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर्तास तुरीची विक्री थांबवणेच योग्य राहील.

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

टॅग्स :तूरशेतीबाजारशेतकरीमार्केट यार्डमार्केट यार्ड