हिंगोली Hingoli येथील मार्केट यार्डात सहा दिवसांनंतर ७ जून रोजी हळदीचे बीट होणार असून, आदल्या दिवशीच शेतकरी हळद घेऊन दाखल झाले असून, मार्केट यार्ड आवारात वाहनांची रांग लागली आहे.
शहरातील संत नामदेव मार्केट यार्डात ३१ मे रोजी हळदीचे बीट झाले होते. त्यानंतर नाणेटंचाई आणि मार्केट यार्डात जागा शिल्लक नसल्याने बाजार समितीने हळदीचे बीट बंद ठेवले होते. यादरम्यान व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या हळदीच्या थप्प्या इतरत्र हलविण्यात आल्या. त्यामुळे शेडमध्ये जागा उपलब्ध झाली असून, ७ जूनपासून हळदीचे बीट होणार आहे.
बीट आणि मोजमाप लवकर व्हावे यासाठी शेतकरी आदल्या दिवशी ६ जून रोजी हळद घेऊन मार्केट यार्ड परिसरात दाखल झाले होते. हिंगोली जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही हळदीची Halad आवक होत होती.
रात्री उशिरापर्यंत मार्केट यार्डात जवळपास ८५ वाहने हळद घेऊन दाखल झाली होती. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत हळदीची आवक स्वीकारण्यात येणार असून, जवळपास ३ ते ३ हजार ५०० क्विंटल हळद विक्रीसाठी येईल, असा अंदाज बाजार समितीने वर्तविला आहे. मात्र पावसाळी वातावरणाने शेतकरी चिंतेत पडले आहेत.
शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या हळदीवर पावसाचे संकट
६ जूनपासून वातावरणात बदल झाला असून, औंढा नागनाथ तालुक्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला. हिंगोली परिसरात पाऊस झाला नसला तरी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विक्रीसाठी आणलेली हळद भिजते की काय, अशी भीती शेतकयांना आहे.
दरम्यान, पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी वाहनांवर मेनकापड झाकले आहे; परंतु जोराचा पाऊस झाल्यास हळद भिजू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.
हेही वाचा - Banana Success Story पारंपरिक पिकांना फाटा देत लागवड केलेली वरुडची केळी गेली आता इराकला