गेल्या काही दिवसांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील हळदीची आवक आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे हळदीच्या दराने उच्चांकी घेतली असून, सोमवारी लिलाव बाजारात हळदीला १८ हजार १०० रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.
मागील महिन्यात आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. दरदिवशी चार ते पाच हजार पोते हळदीची आवक व्हायची. पण, आता शेतकऱ्यांकडील हळद जवळपास ७० ते ८० टक्के थेट
बाजारात विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे हळदीची आवक आता कमी झाल्याने दराने उसळी घेतली आहे. मागील महिन्यात हळदीचे भाव १६ हजारांवर स्थिरावले होते. मात्र, मेच्या शेवटच्या आठवड्यात सोमवारी झालेल्या लिलाव बाजारात कमीत कमी १५ हजार ६०० रुपये, तर जास्तीत जास्त १८ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला, तर सरासरी १६ हजार ८०० रुपयांपर्यंत हळदीची विक्री झाली आहे. येत्या काही दिवसांत हळदीचे दर वाढतील, या आशेने काही मोठ्या शेतकऱ्यांनी हळद साठवून ठेवली आहे.
हिंगोलीत कसा मिळतोय भाव?
हिंगोली येथीलबाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी तीन हजार क्विंटल हळदीची आवक झाली. या हळदीला सरासरी १६ हजार ४०० रुपयांचा भाव मिळाला. दरम्यान, गत आठवड्याच्या तुलनेत पाचशे रुपयांनी भाव वधारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. २७ मे रोजी २ हजार ८२५ क्विंटल हळदीची आवक झाली होती. १५ हजार ३०० ते १७ हजार ५०० रुपयांदरम्यान भाव मिळाला. तर सरासरी १६ हजार ४०० रुपये भाव राहिला.