यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून हळदीला दरवाढीची सुवर्णझळाळी मिळाली. त्यामुळे हळद तयार होताच शेतकरी मार्केट यार्ड गाठत असल्याने मागील आठवड्यापासून आवक वाढली आहे. सध्या सरासरी दोन हजार क्विंटलची आवक होत असून, १६ ते १९ हजार रुपयांदरम्यान प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागांत सध्या हळद काढणी, शिजवणीची लगबग सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांचे हे काम अटोपले असून, सध्या भाव समाधानकारक मिळत असल्याने हळद तयार झाली की मार्केट यार्ड जवळ केले जात आहे. त्यामुळे आवक वाढली असून, संत नामदेव मार्केट यार्डात एक दिवसाआड हळद खरेदी-विक्री केली जात आहे. सरासरी दोन हजार क्विंटल हळद विक्रीसाठी येत असून, येणाऱ्या दिवसांत आणखी आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीने वर्तविली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा हळदीला समाधानकारक भाव मिळत असला तरी उत्पादनात एकरी तीन ते पाच क्विंटलची घट झाली आहे. त्यामुळे भाव जरी समाधानकारक मिळत असला तरी आवकमध्ये झालेली घट पाहता शेतकऱ्यांना भाववाढीचा फारसा फायदा होणार नसल्याचे चित्र आहे.
प्लास्टीक फुलांचा वापर शेतकर्यांच्या मुळावर
हरभऱ्याला मिळाला साडेपाच हजारांचा भाव
जिल्ह्यात यंदा ३६ हजार ४६ हेक्टरवर गहू तर तब्बल १ लाख ५६ हजार ७५० हेक्टरवर हरभऱ्यााचा पेरा झाला होता. सध्या मोंढ्यात हरभऱ्याची आवक सरासरी ७०० ते ९०० क्विंटल होत असून, ५ हजार २०० ते ५ हजार ६५० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. तर सरासरी साडेपाच हजार रुपये क्विंटलने हरभरा विक्री होत आहे.
गव्हाची आवकही वाढली
■ शेतकऱ्यांकडे नवीन गहू उपलब्ध झाला असून, मागील चार दिवसांपासून मोंढ्यात आवक वाढली आहे.
■ सरासरी २५० ते ३०० क्विंटलची आवक होत आहे. तर दोन हजार ते तीन हजार रुपयांदरम्यान भाव मिळत आहे.
■ परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचा पेरा घटला होता. त्यामुळे गव्हाचे उत्पादन यंदा कमीच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.