Turmeric Market :
शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या दरात पंधरवड्यात क्विंटलमागे जवळपास एक हजाराची घसरण झाली आहे. बांगलादेशमार्गे होणारी हळदीची निर्यात अजूनही ठप्प असल्याने त्याचा थेट परिणाम दरावर होत आहे. परिणामी, सध्यातरी भाववाढीची शाश्वती मिळत नसल्याने चिंतेत भर पडल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.हिंगोली बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात मे, जूनमध्ये हळदीने सरासरी १६ हजारांचा पल्ला गाठला होता. तर शंभरातून एक- दोन शेतकऱ्यांच्या हळदीला १८ ते १९ हजारांचा भाव मिळाला.उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता; परंतु जुलै उजाडताच क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाली. ही घसरण एवढ्यावरच थांबली नाही तर ऑगस्टमध्ये पाचशे ते सातशेंनी भाव उतरले.बांगलादेशात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे त्यामार्गे होणारी हळदीची निर्यात थांबली आहे. हिंगोलीच्या बाजारपेठेतून एकूण हळदीच्या जवळपास २५ ते ३० टक्के हळद बांगलादेशमार्गे इतर देशांमध्ये निर्यात होते. परंतु, ही ठप्प झालेली निर्यात काही प्रमाणात भाव गडगडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतमालाची आवक क्विंटलमध्ये गहू ३०५ज्वारी ६३मूग ११सोयाबीन ६८०हरभरा ११२हळद २८००
हळदीची आवक वाढलीहिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डातील हळद खरेदी- विक्रीचे व्यवहार २५ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान बंद होते. त्यामुळे आता आवक वाढली असून, १४ ऑगस्ट रोजी २ हजार ८०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. आवक वाढल्याने एका दिवसात मोजमाप होणे शक्य नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले; परंतु भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी निराशा व्यक्त केली.
पैसे मोकळे होईनातहळद निर्यातीचे पैसे वेळेत मिळत नसल्याच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यातच सध्या बाजारपेठेतही मंदीचे वातावरण निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांतूनही चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी चढ्या भावाने खरेदी केलेली हळद आता कमी भावात विक्री करण्याची वेळ व्यापाऱ्यांवरही आल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकंदरीत हळद मार्केटवर परिणाम होऊ लागला आहे.
हळद स्वीकारणे बंद आवक वाढल्याने बाजार समितीच्या आवारात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. एवढ्या हळदीचे मोजमाप करण्यासाठीही दोन दिवस लागणार असल्याने १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेनंतर हळदी स्वीकारणे बंद करण्यात आले होते. यासंदर्भात बाजार समितीने व्यापाऱ्यांनाही सूचना केल्या होत्या.