Join us

Turmeric Market : मार्केट यार्डात हळदीची आवक घटली; हा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 2:57 PM

हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात मागील दोन दिवसांपासून हळदीची आवक मंदावली आहे. वाचा सविस्तर (Turmeric Market)

Turmeric Market : हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात मागील दोन दिवसांपासून हळदीची आवक मंदावली आहे. दरात घसरण झाल्याने शेतकरी हळद विक्रीसाठी आणत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मंगळवारी केवळ ५०० क्विंटलची आवक झाली होती. मार्केट यार्डात एप्रिल, मेमध्ये हळदीने सरासरी १५ ते १६ हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. परंतु, जून लागताच दरात घसरण होत गेली, ती अजूनही कायम आहे.

परिणामी, ज्या शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत हळद विक्रीविना ठेवली, त्यांना आता पडत्या भावात हळदीची विक्री करण्याची वेळआली आहे. सध्या मार्केट यार्डात सरासरी १२ ते १२ हजार ५०० रुपये एवढा दर मिळत असून, पूर्वीच्या तुलनेत क्विंटलमागे जवळपास तीन हजारांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

त्यामुळे येणाऱ्या दिवसांत दरवाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सध्या आवक मंदावल्याचे चित्र आहे. तर रब्बीच्या तोंडावर हरभऱ्याच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु, शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी हरभरा शिल्लक नसल्याने मोंढ्यात अत्यल्प आवक होत आहे.

५ नोव्हेंबर रोजी ५० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. सरासरी ६ हजार ३८० रुपये भाव मिळाला. तर १५ क्विंटल मूग विक्रीसाठी आला होता. दहा हजार रुपये क्विंटलने मुगाची विक्री झाली.

तसेच ३० क्विंटल उडदाची आवक झाली होती. सरासरी ६ हजार २७५ रुपये दर मिळाला. तुरीची आवक २० क्विंटल झाली होती. ८ हजार ५८० रुपये क्विंटलने विक्री झाली.

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपीकशेतकरीहिंगोली