पावसाच्या लहरीपणामुळे यंदा सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन घटले. त्यातच या शेतमालाला भावही समाधानकारक मिळाला नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. परंतु यंदा हळदीला समाधानकारक भाव मिळत असल्याने काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या जवळा पांचाळ भागात हळद काढणीची लगबग सुरू आहे.
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ भागात इसापूर धरणाचे पाणी मिळते. त्यामुळे या भागात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. परंतु वर्षापूर्वी हळदीला समाधानकारक भाव मिळत नव्हता. तर गतवर्षीपासून मात्र समाधानकारक भाव मिळत असल्याने लागवड क्षेत्र वाढले आहे. यंदा बाजारपेठेत १८ हजार रुपयांपर्यंत हळदीने पल्ला गाठल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. येणाऱ्या दिवसांत आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे. यंदा मात्र शेतकऱ्यांना सोयाबीन कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ आली. बाजारात तेलाचे दर वाढत आहेत. परंतु सोयाबीनचे भाव मात्र वाढत नसल्याने काही शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वसूल झाला नाही.
वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती - मोंढ्यात हळदीची आवक वाढली असून मंगळवारी झालेल्या बिटात हळदीच्या कांडीस प्रतिक्विंटल २१ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला, मोंढ्यात शेतीमालाची आवक येत असून बिटात ४ हजार कट्ट्यांची आवक झाली आहे. भविष्यात हळदीचे भाव अजून वाढतील, असे शेतकऱ्यांना वाटत आहे.
मोंढ्यात १२ मार्च रोजी झालेल्या बिटात कांडी हळदीस २१ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला, तर मंडा हळदीस १६ हजार भाव मिळाला. हळदीचे सरासरी भाव १६ हजार ८०० राहिले. मंगळवारी मोंढ्यात हळदीच्या चार हजार कट्ट्यांची आवक झाली. ९ ते १० महिन्यांपूर्वी हळदीने कधी नव्हे उच्चांकी दर गाठला होता. त्यानंतर आता हळदीच्या दरात मोठी तेजी येताना दिसून येत आहे. मोंढ्यात व खासगी बाजार समितीत नवीन हळद येणे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे दर वाढतील, या आशेने सोयाबीनचा साठा घरात ठेवला आहे.