हिंगोली येथीलबाजार समितीच्या मार्केट यार्डात एप्रिल, मेमध्ये सरासरी १६ हजार रुपयांचा पल्ला गाठलेली हळद घसरली असून, २२ जुलै रोजी सरासरी केवळ १४ हजार ३०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. या दिवशी तीन हजार क्विंटलची आवक झाली होती.
मराठवाड्यासह विदर्भात हळद खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोली येथील संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मे महिन्यात हळदीला विक्रमी १८ ते २० हजारांपर्यंत भाव मिळाला आणि आवकही दररोज चार ते पाच हजार क्विंटल होत होती. जून उजाडताच मात्र भावात घसरण सुरू झाली. परिणामी, आवकही मंदावली. सोमवारी मात्र आवक वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. तब्बल तीन हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याने मार्केट यार्ड आवारात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आवक वाढली; मात्र भावात झालेली घसरण कायम असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. किमान १३ हजार १०० ते कमाल १५ हजार ५०० रुपयांदरम्यान भाव मिळाला. तर सरासरी १४ हजार ३०० रुपयांनी हळदीची विक्री झाली.
गत दोन महिन्यांपूर्वी हळदीला सरासरी १६ हजार रुपयांचा भाव मिळत असताना आणखी भाव वाढतील, या आशेवर काही शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली; मात्र भाव वाढण्याऐवजी घसरल्याने त्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही शेतकरी अजूनही भाववाढीची प्रतीक्षा करीत आहेत; परंतु सध्या तरी भाववाढीची शक्यता कमीच असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मोंढ्यातील शेतमालाची आवक
शेतमाल | आवक | भाव |
गहू | ३०० | २,३६५ |
ज्वारी | ६१ | २,००० |
मूग | ११ | ७,२५७ |
सोयाबीन | ६०० | ४,२४५ |
हरभरा | ५१ | ६,२४५ |
हळद | ३००० | १४,३०० |
मुगाला मिळाला ७ हजारांचा भाव
बाजार समितीच्या मोंढ्यात सोमवारी ११ क्चिटल मुगाची आवक झाली होती. या मुगाला सरासरी ७ हजार २५७ रुपयांचा भाव मिळाला. अलीकडच्या काळात खरिपात मुगाचा पेरा घटला आहे, तर उन्हाळी मुगाचा पेराही कमीच आहे. त्यामुळे मोंढ्यात आवक कमी होत असल्याचे चित्र आहे.
सोयाबीनची ६०० क्विंटल आवक...
जवळपास आठ महिन्यांपासून सोयाबीनची दरकोंडी कायम आहे. किमान सहा हजारांचा भाव अपेक्षित असताना यंदा सोयाबीनने पाच हजारांचा पल्लाही गाठला नाही. परिणामी, शेतकऱ्यांना लागवडही वसूल झाला नाही. सोमवारी ६०० क्विंटलची आवक झाली होती. सरासरी ४ हजार २४५ भाव मिळाला.
आज दुपारी १ वाजेपर्यंतच हळदीची आवक स्वीकारणार
• मार्केट यार्डात सोमवारी हळदीची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने मोजमापासाठी दोन दिवस लागणार आहेत.
• तसेच मार्केट यार्ड आवारातही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे २३ जुलै रोजी दुपारी १ वाजेपर्यंतच हळदीची आवक स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.
हेही वाचा - ज्वारीचे उपपदार्थ करून मिळवा अधिकचा नफा; ज्वारीचे मूल्यवर्धन व पोषणमूल्य