हळदीला आज ना उद्या भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी हळद बाजारात आणण्यापेक्षा घरात ठेवणे अधिक पसंत केले आहे. मध्यंतरी ३० हजारांवर हळदीचे भाव पोहोचले होते. त्यावेळी शेतकरीवर्ग आनंदी होता. परंतु आज १६ हजारांवर हळदीला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे.
गतवर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्यामुळे खरीप हंगाम पुढे चालून चांगला येईल, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. परंतु घरात ठेवलेल्या हळदीचे काय करावे? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.
गतवर्षी सुरुवातीला ३० हजार रुपये भाव हळदीला मिळाला. त्यावेळी शेतकरीवर्ग आनंदी झाला होता. परंतु मध्येच हळदीचे भाव उतरू लागले आणि १६ हजार रुपये भाव मिळू लागला. तेव्हापासून शेतकऱ्यांनी हळद घरातच ठेवणे पसंत केले.
सद्यःस्थितीत हळदीला २५ ते ३० हजार रुपयांचा भाव मिळाला असता तर खरिपातील पेरणीसाठी पैसा कामाला आला असता. परंतु ऐनवेळी हळदीचा भाव कमी झाल्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांजवळ पैसाही राहिला नाही. जोपर्यंत हळदीला चांगला भाव मिळत नाही. तोपर्यंत हळद घरातून बाजारात न्यायची नाही, असे काही शेतकऱ्यांनी ठरविले आहे.
हळदीला भाव मिळेल; शेतकऱ्यांना आशा
भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी घरात हळद ठेवली आहे. पुढे चालून हळदीला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मोंढ्यात हळद आणली तर भाव मिळत नाही म्हणून हळद घरात ठेवावी लागत आहे. - संजय गुळगुळे, शेतकरी.
हळदीच्या दरात तेजी येईल असे शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु हळदीच्या दरात मंदीचे सावट असल्याने दर १६ हजारांच्या पुढे सरकत नाहीत. त्यामुळे घरात हळद ठेवणे शेतकऱ्यांनी पसंत केले आहे. गतवर्षी हळदीचे दर २० ते २२ हजारांवर पोहोचले होते. यंदा हळदीचे दर उतरले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त आहे. - बालाजी दळवी, शेतकरी.
शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी रात्रंदिवस शेतात राबतो. वन्यप्राण्यांची भीती न बाळगता शेतात पिकांना पाणी देतो. परंतु काढणीनंतर मात्र कापूस, हळद, तूर आदी पिकांच्या बाबतीत नेहमीच त्रुटी काढल्या जातात. त्यामुळे शेतीमालात त्रुटी न काढता योग्य भाव देणे आवश्यक आहे. - गौस शेख, शेतकरी.
हळदीला आजमितीस १६ हजार रुपये भाव असला तरी पुढे चालून भाव मिळेल हळदीचे दर वाढतील अशी आशा आहे. भाव मिळेल या आशेनेच शेतकऱ्यांनी हळद घरी साठवून ठेवली आहे. - पुष्पेंद्र आकरबोटे, व्यापारी.