खुल्या बाजारपेठेत तुरीच्या भावात घसरण झाली असून, बाजारपेठेत ६,२०० ते ८,६०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरीवर्ग पुन्हा चिंतेत पडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दिवाळीपूर्वी तुरीचे दर १० ते १२ हजार रुपये क्विंटलच्या घरात होते. मात्र, दिवाळीनंतर दरात ४ ते ६ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तुरीचे दर का घसरले, म्हणून शेतकरी चिंतेत पडला आहे. अतिवृष्टीचा पाऊस व अवकाळी पावसामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्नही केले. यानंतर, तुरीचे पीक वाचविताना मोठ्या प्रमाणात खर्चही शेतकऱ्यांना करावा लागला. मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे तुरीचे पीक जळाल्याने तुरीचे क्षेत्र कमी झाले. संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती असल्याने तुरीचे दर वाढतील, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. प्रत्यक्षात तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
तुरीचे भाव व उत्पन्नही कमी...
■ मागणी व पुरवठ्याचा सिद्धांत पाहता उपलब्धता कमी असेल तर दर वाढतात.
■ मात्र, शेतीमालाच्या बाबतीत असे काही होत नाही. तुरीचे उत्पन्न कमी असले, तरी दरात मात्र कुठलीही सुधारणा झालेली नाही.
■उलट दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिता पसरली असून, भाववाढीची प्रतीक्षा आहे.