बारामती : बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनामार्फत नाफेड व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांचे वतीने हमीभाव तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ सभापती विश्वास आटोळे यांचे हस्ते करण्यात आला.
हंगाम २०२४-२५ मध्ये केंद्र सरकारच्या पीएसएस योजनेंतर्गत २४ जानेवारीपासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने कळविल्यानुसार हमीभावाने शेतकऱ्यांची तूर खरेदी करणेकरिता ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली अशा शेतकऱ्यांनी तूर आणून खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे सभापती विश्वास आटोळे यांनी केले आहे.
तूर खरेदी पूर्ण जिल्ह्यात फक्त बारामती येथे सुरू झाले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपसभापती खलाटे रामचंद्र यांनी केले.
पहिल्याच दिवशी ४० क्विंटल तूर खरेदी
- केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या साडेसात हजार रुपये या हमी दरानुसार तूर खरेदी करण्यात येणार आहे.
- शुभारंभाचे पहिल्या दिवशी इनामगाव (ता. शिरूर जि. पुणे) येथील शेतकरी दिलीपराव मोकाशी, संग्राम मोकाशी, गोपाळराव मोकाशी, अमरसिंह मोकाशी, सुरेखा मोकाशी या शेतकऱ्यांची ४० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
- नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४५ शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली आहे.
कशी आहे खरेदीची प्रक्रिया?
१) शासनाच्या निकषांप्रमाणे जमिनीचा ७/१२ उतारा व त्यावर तुरीची नोंद असलेला सन २०२४-२५ पीकपेरा, आठ-अ, आधारकार्ड आणि आयएफएससी कोडसह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर आदी संपूर्ण कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
२) ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात येणार असल्याने मुदतीत शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.
३) नोंदणीकृत शेतकऱ्यांना खरेदीवेळी एसएसएमद्वारे कळविणेत येईल, त्याच तारखेला तूर आणावयाची आहे.
४) खरेदी केंद्रावर तूर आणताना शासनाचे निकषांप्रमाणेच आणावी.
अधिक वाचा: जिद्दी शेतकरी राहुलने टँकरच्या पाण्यावर अर्ध्या एकरात विकली अडीच लाखांची कलिंगडे; वाचा सविस्तर