सांगली : गेल्या १० ते १२ वर्षात राजापुरी हळदीला सहा ते १० हजारांपर्यंत दर मिळाला होता. पण, यावर्षीचा हळदीचा हंगाम सुरू झाल्यापासून भाववाढीची झळाळी मिळाली. मागील आठवड्यात सरासरी १९ हजार ३५० ते २७ हजार रुपये क्विंटलने हळदीची विक्री झाली आहे.
या हंगामामध्ये प्रतिक्विंटल ४१ हजार १०१ रुपयांचा उच्चांकी दरही सांगलीमार्केट यार्डात मिळाला आहे. सांगली मार्केट यार्डात ऑगस्ट, सप्टेंबर २०२३ मध्ये हळदीला सरासरी प्रतिक्विंटल १५ ते १६ हजारांचा उच्चांकी दर मिळाला होता, त्यानंतर मात्र दरात घसरण होत गेली.
ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये एक ते दीड हजारांची घसरण झालेली डिसेंबर, जानेवारीत कायम राहिली, तर फेब्रुवारीत सरासरी भाव १२ ते १३ हजारांपर्यंत स्थिर राहिले. त्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत हळद विक्रीविना ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती.
मात्र, १ मार्चपासून सरासरी १६ हजारांवर भाव मिळत होता, तर ४ मार्चपासून जवळपास चार ते पाच हजार रुपयांची वाढ झाली, मंगळवार दि. ५ मार्च रोजी तर राजापुरी हळदीला सरासरी २७ हजार ३०० ते ४१ हजार १०१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
हळदीला भाववाढीची चकाकी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, सध्या नवीन हळदीची आवक अत्यल्प आहे: परंतु जवळपास एक महिन्यानंतर दिलासा आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मागील चार ते पाच वर्षात हळदीला दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी लागण कमी केली, तसेच पाऊस कमी झाल्यामुळे क्षेत्रही घटले आहे. देशातच हळदीचे ३० टक्के उत्पादन कमी आहे. गुजरात, मध्य प्रदेशला हळदीची मागणी जास्त आहे. त्यामुळे हळदीचे दर वाढले आहेत. सरासरी दराचा विचार केल्यास गेल्या १२ वर्षांतील उच्चांकी दर आहेत. - मनोहर सारडा, हळद व्यापारी