एकीकडे पंधरवड्यापासून पाऊस पाठ सोडत नसल्याने नदी, नाल्याकाठीची पिके धोक्यात आली असताना दुसरीकडे बाजारपेठेत शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे रविवारच्या आठवडी बाजारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भुसार शेतमालाची खरेदी- विक्री केली जाते. मात्र, काही दिवसापासून बाजारपेठेत शेती मालाचे भाव खूपच कमी झाले आहेत. यामध्ये सोयाबीनची व्रिक्री कवडीमोल दराने करावी लागत आहे. तसेच हळदीचे भावही घसरले आहेत. जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात या परिसरात ४० ते ५० गावातील शेतकरी शेतमाल व्रिक्रीसाठी आणत असतात.
मात्र, गत अनेक दिवसांपासून शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत मागील सात ते आठ महिन्यांपासून सोयाबीनचे भाव कायम पडते आहेत. नवीन सोयाबीन दोन महिन्यात येणार असल्यामुळे जुने सोयाबीन शेतकरी विक्रीसाठ बाजारपेठेत आणत आहे. परंतु, ४ हजार ३०० रूपयांवर भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या शेतकरी खते फवारणी, विविध कामासाठी शेतमाल विक्री करत आहेत.
सुरुवातीला हळदीला १६ ते १७ हजार प्रति क्विंटलचा भाव मिळत होता. आता मात्र हळदीला सरासरी १४ ते १४ हजार ५०० रूपये भाव मिळू लागला आहे यात शेतकऱ्यांना आर्थिक फटक बसला आहे.