Join us

घसरलेली हळद पाचशे तर सोयाबीन तीनशेंनी वधारले; नक्की काय भाव मिळाला वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 7:29 PM

हिंगोली येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळद आणि सोयाबीनला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

हिंगोली येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात सरासरी १६ ते १७ हजारांपर्यंत विक्रमी भाव मिळालेल्या हळदीच्या दरात जूनमध्ये घसरण झाली. एप्रिल, मेच्या तुलनेत क्विंटलमागे जवळपास दोन ते तीन हजाराने दर घसरले असताना आता केवळ ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दरवाढीची प्रतीक्षा आहे. तर, सोयाबीनच्या दरातही गेल्या आठवड्याच्या तुलनेत २०० ते ३०० ची वाढ झाली आहे. हळद खरेदी-विक्रीसाठी मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या हिंगोली बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात यंदा हळदीला विक्रमी भाव मिळाला.

एप्रिल आणि मेदरम्यान सरासरी चार ते पाच हजार क्विंटलची आवक होती. परंतु, जून लागताच हळदीच्या भावात घसरण सुरू झाली. ती ऑगस्टच्या शेवटपर्यंतथांबली नाही.

मागील चार दिवसांपासून मात्र भावात किंचित वाढ झाल्याने हळद उत्पादकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. परंतु, हळदीचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

सोयाबीनची तर मागील दहा महिन्यांपासून दरकोंडी कायम आहे. गेल्यावर्षी नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात प्रचंड घट झाली. अशा परिस्थितीत किमान सहा हजार रुपयांचा भाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते.

परंतु, सोयाबीनने पाच हजाराचाही पल्ला गाठला नाही. आता महिन्याभरात सोयाबीनचा हंगाम सुरू होणार आहे. यंदा तरी सोयाबीनला समाधानकारक भाव मिळण्याची आशा आहे. मागील चार दिवसांपासून क्विंटलमागे दोनशे ते तिनशेंची वाढ झाली आहे. परंतु, हा भाव समाधानकारक नसून, सोयाबीनला किमान सहा हजाराचा भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

मुगाने गाठला दहा हजारांचा पल्ला

यंदा मान्सूनचे वेळेत आगमन झाल्याने खरिपाच्या पेरण्या मृगात झाल्या. त्यामुळे मूग, उडदाचा पेरा गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढला. सध्या मोंढ्यात मूग विक्रीसाठी येत असून, ९ हजार ६०० ते १० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. गुरुवारी (५ सप्टेंबर) रोजी १० क्विंटल मूग विक्रीसाठी आला होता.

यंदा सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता

ऐन शेंगा लागण्याच्या अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव झाला असताना दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीचाही फटका बसला. परिणामी, यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत किमान समाधानकारक भाव तरी मिळावा, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

मोंढ्यात विक्रीस आलेला शेतमाल...

शेतमाल आवक (क्वि. मध्ये)  सरासरी भाव
तूर६०१०,२७५
भुईमूग४००६,१००
मूग१०९,८००
सोयाबीन६०५४,४२५
हळद१५००१३,५५०

भावातील चढ-उतार...२८ ऑगस्ट

हळद        १२०००

सोयाबीन      ४१४०

२९ ऑगस्ट

हळद         १२४००

सोयाबीन      ४१३७

३० ऑगस्ट

हळद      १२८४०

सोयाबीन   ४१७२

४ सप्टेंबर

हळद      १३०५०

सोयाबीन   ४५२४

५ सप्टेंबर

हळद    १३५५०

सोयाबीन   ४४२५

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डहिंगोली