नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांभळाची आवक वाढू लागली आहे. सद्यःस्थितीमध्ये रोज सरासरी दोन ते अडीच टन आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये जांभूळ २०० ते २५० रुपये भाव मिळत असून, किरकोळ मार्केटमध्ये ४०० ते ५०० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
बाजार समितीमध्ये बुधवारी अडीच टन आवक झाली आहे. याशिवाय बदलापूर, पनवेल ग्रामीण व इतर ठिकाणांवरूनही शहरात जांभळे विक्रीसाठी येत आहेत. होलसेल मार्केटमध्ये २०० ते २५० रुपये दराने विक्री होत आहे.
किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ४०० रुपयांपासून ५०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. शहरातील सर्व फळमार्केटबरोबर ग्रामीण भागातून आलेल्या महिलाही जांभळाची विक्री करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
जांभळाचे फळ व बिया दोन्हीही आरोग्यासाठी लाभदायक आहेत. हृदयरोग, रक्तदाब, मधुमेहापासून अनेक रोगांवर हे फळ व बिया दोन्हीही लाभदायक असतात. मधुमेह व रक्तदाब असलेले रुग्ण बियांची पावडर तयार करून वर्षभर वापर केला जातो. त्यामुळे मागील काही वर्षांपासून जांभळाला मार्केटमध्येही चांगला भाव मिळत आहे.