डाळवर्गीय पीक असलेल्या उडदाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. शनिवारी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत या शेतमालास तब्बल ९ हजार १८५ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा कमाल दर मिळाला. इतरही बाजार समित्यांत उडदाला ८ हजारांवर दर मिळाले. तथापि, जिल्ह्यात उडदाचे क्षेत्रच नगण्य असल्याने बाजार समित्यांत या शेतमालाची मोजकीच आवक होत आहे.
जिल्ह्यात गतवर्षी मान्सूनला विलंब झाल्याने गत खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मूग आणि उडदाच्या पेरणीकडे पाठ केली. केवळ सहा हजार हेक्टरच्या जवळपास उडदाची पेरणी झाली होती. त्यात अतिवृष्टी आणि अवर्षणामुळे या पिकाचे नुकसानही झाले. त्यामुळे उत्पादनात अधिकच घट आली. त्यानंतर उन्हाळी हंगामात केवळ ८६.७० हेक्टरवर उडदाची पेरणी झाली.
आता डाळवर्गीय पिकांना मागणी असून, उडदाचे दर दहा हजारांकडे वाटचाल करू लागले आहेत. तथापि, शेतकऱ्यांकडे हा शेतमालच नसल्याने या दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नसून, बाजार समित्यांत या शेतामालाची अगदीच नगण्य आवक होत आहे. शनिवारी वाशिम बाजार समितीत केवळ ८० क्विंटल, रिसोड बाजार समितीत ६० क्विंटल, तर मंगरूळपीर बाजार समितीत या शेतमालाची केवळ ४० क्विंटल आवक झाली होती.
कोणत्या बाजार समितीत उडिदाला किती दर
रिसोड - ९१८५
वाशिम - ९०००
मं.पीर - ७३९५
सर्वच डाळवर्गीय पिके तेजीत
मागील काही दिवसांपासून बाजारात डाळवर्गीय पिकांच्या दरात प्रचंड तेजी दिसून येत आहे. तुरीचे दर ११ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलच्यावर आहेत, तर मुगाचे दर ८ हजार रुपये प्रती क्विंटल असून, हरभऱ्याचे दरही सहा हजार रुपये प्रती क्विंटलच्याही वर पोहोचले आहेत. नव्या हंगामातील पेरणीलाच अद्याप महिनाभराचा वेळ असताना आणि शेतकऱ्यांकडे डाळवर्गीय शेतमाल नावापुरताच असल्याने या पिकांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Success Story शेडनेट, पॉलिहाऊसमधून काकडी, शिमला मिरचीचे लाखोंचे उत्पन्न