बारामती : बारामतीबाजार समितीमध्ये नवीन उडदाला उच्चांकी प्रतिक्विंटल ७८०० दर मिळाला आहे. बाजार समितीमध्ये चालू खरीप हंगामातील नवीन उडदाची आवक सुरू झाली आहे.
सोमवारी (दि. २३) आडतदार अशोक सालपे व शिवाजी फाळके यांचे आडतीवर शेतकरी विनोद सणस, माळेगाव व संतोष गावडे, मेडद यांच्या उडदाला प्रतिक्विंटल ७८०० असा उच्चांकी दर मिळाला.
तर सरासरी रु. ७३५१ दर निघाला असून, खरेदीदार सिद्धार्थ गुगळे व अमोल वाडीकर यांनी खरेदी केला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
बारामती बाजार समितीमध्ये लिलावापूर्वी शेतमालाचे इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मापाड्यांमार्फत अचूक वजन, योग्य बाजारभाव व त्याचदिवशी पट्टी याच विश्वासार्हतेमुळे आसपासच्या तालुक्यातील शेतकरी शेतमाल घेऊन येत असल्याचे बाजार समितीचे सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी सांगितले.
यंदा वेळेत व समाधानकारक पाऊस पडल्याने उडदाच्या पेरण्या वेळेत झाल्या. त्यामुळे उडदाचे चांगले उत्पादन मिळत आहे.
बारामती बाजार समितीमध्ये आवक मोठ्या प्रमाणात होत असून, नवीन स्वच्छ व वाळलेल्या उडीद शेतमालास इतर बाजार समित्यांपेक्षा खूप चांगले बाजारभाव मिळत असल्याने बारामती परिसरातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बारामती समितीमध्ये आणतात.
असे बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले. उडदाला आणखी दर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी माल स्वच्छ व वाळवून आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
ऊस पिकात आंतरपिक म्हणुन उडीद पिकाची लागवड केली आहे. ७० ते ९० दिवसांत हे पिक आले आहे. गेल्या चार वर्षापासून उडीद लागवड करीत आहे. तीन एकरात सुमारे १५ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. सरासरी एकरी ५ क्चिटल उत्पादन मिळाले आहे. - संतोष गावडे, शेतकरी मेडद