करमाळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान ४२ हजार ८४१ पिशव्या म्हणजे २८ हजार १२५ क्विंटल उडदाची आवक झालेली आहे. या उडीद खरेदीतून बाजार समितीमध्ये २२ दिवसांत तब्बल २१ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.
करमाळा बाजार समितीमध्ये दररोज किमान ५ हजार क्विंटल उडदाची आवक होत असून चालू हंगामात सुमारे ७५ कोटींची बाजार समितीमध्ये उडीद खरेदीमध्ये आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
यंदा वेळेवर व समाधानकारक पाऊस पडल्याने गेल्या दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच जूनमध्ये पेरणी झाली. शेतकऱ्यांनी उडीद, तूर, मका, कांदा या पिकांची पेरणी केली.
तालुक्यात पहिल्यांदाच यंदा तब्बल २३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर उडीद पेरणी झाली. उडीद पेरणीनंतर वेळेवर समाधानकारक पाऊस पडल्याने उडदाचे चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले.
उडीद पेरणीनंतर सव्वा महिना ते पावणेतीन महिन्याचे पीक आहे. या पिकास चांगला बाजारभाव मिळत असल्याने यांना शेतकऱ्यांनी सरासरीच्या दुप्पट क्षेत्रात उडदाची पेरणी केली. करमाळा बाजार समितीमध्ये दररोज ५००० क्विंटल उडदाची आवक होत आहे.
करमाळा तालुक्यासह शेजारील कर्जत, जामखेड, माढा, परंडा या भागातून शेतकरी येथील बाजार समितीमध्ये उडीद विक्रीसाठी आणता आहेत. उडदाला करमाळा बाजार समितीमध्ये ६ हजार ५०० ते ८ हजार प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत आहे.