मंगळवेढा : नैसर्गिक संकटे पाठ सोडत नसल्याने पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट होत आहे. तर बाजारात शेतमालाला मिळणारे भावही बेभरवशाचे झाले आहेत. चार दिवसांपूर्वी उडीद कडधान्याला असलेला ८,३०० रुपये भाव अचानक दोन ते तीन हजारांनी कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
आठवड्यात शेतमालाचे पडणारे भाव लक्षात घेतल्यास जगावं तरी कसं? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे. सरकारने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीपेक्षा व्यापारी मनमानीपणे शेतकऱ्यांना दर देत असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
खरीप हंगामात उडीद लागवड क्षेत्रात वाढ झाली. उडीद काढणीचा हंगाम सुरू होताच बाजारातील उडिदाचा दर ८००० ते ८५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होता. आता तो ३ हजारांच्या खाली आला आहे.
दरम्यान, रब्बी ज्वारीचे उत्पादनही जास्त होऊन ज्वारीला दर न मिळाल्याने खरीप उडीद साथ देईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, सरकारी यंत्रणेच्या बेपर्वाईमुळे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.
ब्रह्मपुरी येथील शेतकरी संजय पाटील यांनी मागील आठवड्यात बेगमपूर येथील व्यापाऱ्याकडे दिलेल्या उडिदला ८,३०० रुपये दर मिळाला; मात्र दोन दिवसांपूर्वी पून्हा यापेक्षा चांगल्या गुणवत्तेचा उडीद दिला असता त्यास ५,२०० रुपये दर आहे, असे सांगण्यात आले.
प्रतवारीचे कारण पुढे करीत व्यापारी मनमानी दर आकारत आहेत. याबाबत शेतकऱ्यांतून संतापाचा उद्रेक होत असून इतर तालुक्यांत शेतकरी लिलाव बंद पाडत आहेत.
हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा
शेतकऱ्यांनी राबराब राबून पीक काढायचे आणि त्याला भाव नाही मिळाला की दुःख करत बसायचे, अशीच शेतकऱ्यांची अवस्था आहे. यंदा उडिदाला चांगला भाव येईल, असे वाटत होते; मात्र शासनाच्या ७,५०० रुपये क्विंटल या हमीभावपेक्षा २ हजार रुपये कमी दर शेतकऱ्यांना दिला जात आहे. प्रशासनाचे व्यापाऱ्यांच्या लुटीवर नियंत्रण नाही. हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्या व्यापाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भैरवनाथ विकास सोसायटीचे चेअरमन संजय पाटील यांनी दिला आहे.
व्यापाऱ्यांनी सरकारने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीपेक्षा माल कमी भावात घेतला असेल तर व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच शेतकऱ्यांना किंमत पटत नसेल तर त्यांना बळजबरी न करता तत्काळ माल परत दिला पाहिजे. - डी. एस. भवर, सहायक निबंधक, मंगळवेढा