करमाळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासन हमीभावाप्रमाणे उडिदाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अडत बाजारातील लिलाव बंद पाडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून उडिदाला हमीभावाप्रमाणे दर द्या, या मागणीचे लेखी निवेदन दिले.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंधरा दिवसांपासून उडिदाची मोठी आवक होत आहे. उडिदाला समाधानकारक भाव मिळत असल्याने तालुक्यासह लगतच्या कर्जत, जामखेड, इंदापूर, माढा या भागातील शेतकऱ्यांनी करमाळा बाजार समितीत मोठ्या प्रमाणात उडीद विक्रीसाठी आणलेला आहे.
शुक्रवारी आठवडी बाजाराचा दिवस असताना मुद्दाम लिलाव बंद ठेवण्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत सोमवारी कमी दराने होणारे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले.
बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन याबाबत तक्रारही करण्यात आली. शासनाच्या दराप्रमाणे हमीभाव द्यावा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तहसील कार्यालया समोर ठिय्या मांडून तहसीलदार यांना निवेदन दिले.
त्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उडीद पिकाला किमान हमीभाव ७,४०० रुपये असताना करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी ५००० ते ६५०० या कमी दाराने खरेदी करत आहेत.
त्यामुळे प्रशासनाने रुपये ७,४०० ते रुपये ९,९०० या दराने उडिदाची खरेदी करण्याची सूचना बाजार समितीस करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास बुधवारी, दि. ११ रोजी अहमदनगर-सोलापूर बायपास रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आहे.
करमाळा बाजार समितीमध्ये शेतकऱ्या समक्ष उघड पद्धतीने मालाची प्रतवारी व विक्री करण्याची प्रथा आहे व प्रतवारी केलेल्या शेतमालाची २४ तासांत मापे केली जातात व पट्टीही दिली जाते. शेतमालाचा भाव बाजार समिती ठरवत नाही, तर शेतकरी-व्यापारी यांच्यातील दुवा म्हणून नियंत्रण ठेवण्याचे काम बाजार समिती करते. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा, यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. - जयवंतराव जगताप, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, करमाळा