Urad Bhajar Bhav :
लातूर : खरिपातील उडीद आणि मुगाच्या राशी होऊन जवळपास महिना उलटला आहे. अडत बाजारात उडिदाला हमीभावापेक्षा अधिक दर असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी विक्री केली आहे. परिणामी, बाजारपेठेत आवक अत्यंत कमी झाली आहे.
दरम्यान, 'नाफेड' मार्फत मूग, उडीद खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली असली तरी मागील तीन दिवसांत एकही नोंदणी नाही. यंदाच्या खरीप हंगामात वेळेवर पाऊस झाल्याने जिल्ह्यात ५ लाख ९८ हजार ८३२ हेक्टरवर पेरा झाला.
त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा ४ लाख ९० हजार ९०६ हेक्टरवर झाला. त्यापाठोपाठ तुरीचा, तर मुगाचा ७ हजार १४१, उडिदाचा ५ हजार ९४४ हेक्टरवर पेरा झाला होता. कधी मध्यम, तर कधी पिकांपुरता पाऊस झाल्याने खरिपातील पिके चांगली बहरली. ऑगस्टअखेरीस मूग आणि उडिदाची काढणी सुरू होऊन राशींना प्रारंभ झाला. आर्थिक अडचणींतील शेतकऱ्यांनी बाजारपेठेत मूग, उडिदाची विक्री सुरू केली. मुगाचा दर कमी असल्याने फटका सहन करावा लागला.मूग, उडीदची आवक घटली...
गेल्या काही वर्षांपासून नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी, मूग आणि उडिदाचा पेरा घटला आहे. अगदी अल्प प्रमाणात पेरणी होत आहे. या पिकांच्या राशी होऊन जवळपास महिना उलटला आहे. आर्थिक संकटातील शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री केली आहे. परिणामी, बाजार समितीत आवकही घटली आहे. शुक्रवारी मुगाची ६१६, तर उडिदाची २९२८ क्विंटल आवक झाली होती.
सोयाबीन विक्रीसाठी ४०९ जणांची नोंदणी...
सध्या बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे क्विंटलमागे जवळपास ४०० ते ४५० रुपयांचा फटका बसत आहे. परिणामी, नाफेडच्या केंद्राकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून होते. १ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. तीन दिवसांत ४०९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
नोंदणीसाठी ई-पीक पाहणी आवश्यक
मूग, उडीद, सोयाबीनची हमीभाव खरेदी केंद्रांवर विक्री करण्यासाठी ७/१२, ई-पीक पाहणी केलेला पीकपेरा, आधारकार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.
तीन दिवसांपासून नोंदणी
शेतमाल | हमीभाव | बाजारभाव |
मूग | ८६८२ | ७२०० |
उडीद | ७४०० | ७५०० |
सोयाबीन | ४८९२ | ४४८० |
जिल्ह्यात १४ केंद्रे, लवकर नोंदणी करा...
हमीभावाने शेतमाल खरेदीसाठी नाफेडमार्फत जिल्ह्यात १४ केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. तीन दिवसांत मूग, उडीद विक्रीसाठी एकही नोंदणी नाही. सोयाबीनसाठी ४०९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी. १५ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे. - विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.