व्हॅलेंटाइन वीकमुळे गुलाब फुलांची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनीही गुलाबाची आवक वाढविली आहे. सद्य:स्थितीत फुलांचा आकार आणि रंगानुसार ३० फुलांची पेंडी १०० ते ११० रुपयांपासून गुलाबाची विक्री होत आहे. मागील आठ दिवसांच्या तुलनेत गुलाबाचे दर ५० टक्क्यांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. व्हॅलेंटाइन वीकबरोबरच लग्नसराईमुळेही गुलाबाचे दर वाढले आहेत, असेही व्यापारी म्हणत आहेत.
फेब्रुवारी महिना सुरू झाला की, तरुणाईला 'व्हॅलेंटाइन डे'चे वेध लागतात. मात्र, या दिवसाचे सेलिब्रेशन करण्यापूर्वी आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे होतात. बुधवारी 'रोझ डे'ने या सप्ताहाची सुरुवात झाली. प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाबाच्या फुलाला महत्त्व असते. प्रेमाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज असून, सेलिब्रेशनची तयारी सुरू आहे.
लग्नसराई आणि व्हॅलेंटाइन वीकमुळे प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबाचे फूल प्रतिडझन १५ ते २० रुपयांनी महागले आहे. व्हॅलेंटाइनच्या उत्सवासाठी फूल बाजार गुलाबपुष्पांनी सजला आहे. त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे साजरा होणार आहे. लग्नसराईमुळे सध्या गुलाबासह सर्वच फुलांना चांगला दर मिळत आहे. मागील आठवड्यात गुलाबाच्या ३० फुलांच्या पेंडीला ३० ते ५० रुपये दर होता.
शुक्रवारी सांगली, मिरजेतील फुलांच्या बाजारात ३० गुलाबाच्या पेंडी १०० ते ११० रुपयांनी विक्री झाली आहे. आठ दिवसांत ५० टक्क्यांनी फुलांच्या दरात वाढ आहे. व्हॅलेंटाइन सप्ताहामुळे गुलाब फुलामध्ये दरवाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली.
अन्य राज्यांतही मागणी वाढलीलग्नसराईसह विविध कार्यक्रमांमुळे गुलाब, जरबेरा, निशिगंध, झेंडू या फुलांना कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळेच सध्या फुलांच्या दरात वाढ होऊ लागली आहे, असे फूल व्यापाऱ्यांनी सांगितले.