Vegetable Market : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाने मोठ्या प्रमाणावर आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. त्यातच भाजी बाजारात शेवगा १६० रुपये किलोपर्यंत पोहोचला असून, किरकोळ भाजी बाजारात वांगी, टोमॅटो, भेंडी, फ्लॉवरसह सर्वच फळभाज्यांचा सरासरी ८० रुपये किलोचा दर पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीस झालेल्या परतीच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे भाजी बाजारात भाज्यांची आवक घटली असून, भाजीपाल्याचे दरदेखील वाढले आहेत.
भाजी बाजारात निवडक पालेभाज्यांसह फळभाज्यांचे भाव सरासरी ६० ते १२० रुपये किलोवर पोहोचले आहेत. शेवग्याच्या शेंगा १६० रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. पावकिलोला मात्र ३० रुपयांचा दर मिळतोय.
लातूर येथील भाजीपाला बाजारात पालेभाज्यांचे कडाडले आहेत. बाजारात बहुतांश भाजीपाला ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. शेतकऱ्यांच्या कोथिंबीर ४० ते ५० रुपयांनी खरेदी केली जात असली तरी किरकोळ विक्री मात्र ५० रुपये पावकिलो प्रमाणे केली जात आहे. लातूर शहरातील गंजगोलाई, बार्शी रोड, राजीव गांधी चौक, नवीन रेणापूर नाका भागात दररोज भाजीपाला विक्रीची दुकाने लागलेली असतात.
शिवाय, मेथी, शेपूच्या भाजीची जुडी ३० रुपयांना मिळत आहे. दिवाळीत यंदा किराणा साहित्य महागल्याने अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच मागील आठ दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने सर्वसामान्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे.
आद्रक, लसणाचे दर मात्र मागील दोन महिन्यांपासून जैसे थे आहेत. सध्या लातूरच्या बाजारात आद्रक १२० ते १५० रुपये किलो तर लसूण ३०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.
दिवाळीत चिवड्यासाठी लागणारा कढीपत्ता चांगलाच भाव खात आहे. दहा रुपये छटाकप्रमाणे कढीपत्ता मिळत आहे. सध्या लातूरच्या बाजारात भाजीपाल्यांची आवक घटल्यामुळे दरवाढ झाली आहे.
रब्बी हंगामातील पेरण्या सुरू झाल्यामुळे आता अनेक शेतकरी नवीन रब्बी भाजीपाल्याचीही लागवड करतात. आवक वाढताच दर घसरतात, अशी बाजारातील स्थिती आहे.
भाजीपाल्याची आवक सध्या कमी असून, मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. डाळींचे दर वाढल्याने भाजीपाला खरेदीवर ग्राहकांचा अधिक भर आहे. आणखी काही दिवस ही स्थिती राहणार आहे. - मदन गाढवे, भाजीपाला व्यावसायिक, वाशिम
शेतकऱ्यांनाही मोठा फटका
वाढलेल्या भाजीपाला दराचा फटका सर्वसामान्यांना बसत असताना शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. यंदाही वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली होती. मात्र, सप्टेंबरअखेर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. यात टोमॅटोसह कोथिंबीर, वांगी, पालेभाज्या, कोबी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवकही घटली आहे.
उत्पादकांपेक्षा विक्रेत्यांची चंगळ
लातूर शहरातील भाजीपाला बाजारात किरकोळ भाजीपाल्याची विक्री जवळपास दुपटीने केली जात आहे. शेतकऱ्यांकडून ४० ते ५० रुपये किलोप्रमाणे खरेदी केलेली कोथिंबीर १० रुपये छटाकाप्रमाणे विक्री केली जात आहे. तसेच दिवाळीत चिवड्याची चव वाढविणारा कढीपत्ताही चांगलाच भाव खात आहे. कोथिंबीर प्रमाणे कढीपत्ताही महागला आहे. यात शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने खरेदी करून विक्रेते मात्र, तीप्पट नफा कमवित आहेत.
कांद्याची आवक वाढली...
दोन महिन्यांपूर्वी कांद्याच्या दराने सर्वसामान्यांना रडविलेच होते. आता मात्र, नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यापासून दिवसेंदिवस दर घसरत आहेत. सध्या लातूरच्या बाजारात चांगला कांदा ३० ते ४० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे, तर कांदा पात जुडी २० रुपयाला एक विक्री होत आहे. मागील आठ दिवसांपासून भाजीपाल्याची आवक घटली आहे.
असे आहेत भाजीपाल्याचे दर
भाजीपाला | वाशिम बाजारात दर | लातूर बाजारात दर |
शेवगा | १६० | ८० |
गवार | १२० | १०० |
टोमॅटो | ८० | - |
भेंडी | ६० | ६० ते ८० |
फुलकोबी | ८० | ६० ते ८० |
कांदा | ६० | - |
बटाटे | ५० | ४० |
मेथी | ८० | जुडी ३० |
पालक | ४० | - |
कारले | - | ८० |
दोडका | - | ८० |
चवळीची शेंगा | - | १२० |
हिरवी मिरची | - | ८० ते १०० |
पत्ता कोबी | - | ४० |
कोथिंबीर | ४० ते ५० | ४० ते ५० रुपये किलो |
वांगी | ६० | ६० ते ८० |