सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. सणावाराला सुरुवात झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच लाभ होत आहे.
एरवी २० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्रीला असणारा भाजीपाला ६० ते १०० रुपये किलो दराने विक्रीला जात आहे. शेवगा, गवारी प्रतिकिलो ८० ते १०० रुपये दर आहेत. आलू, कांदे, पत्ताकोबी आदींचे भाव फारसे वाढले नाही.
८० रुपये बहुतांशी भाज्यांचे दर
अतिवृष्टी व बदलत्या वातावरणामुळे सध्याच्या स्थितीत बाजारपेठेत भाजीपाला ८० रुपये किलोच्या जवळपास आहेत.
शेवगा, गवारी सर्वाधिक महाग
शेवगा व गवारी ही आरोग्यदायी भाजी सर्वाधिक महाग विकली जात आहे. या भाजीस मागणी अधिक असते.
वांगी, भेंडी, टोमॅटो ४० ते ६० रुपये किलो
बाजारपेठेत सध्या वांगी, भेंडी, मिरची, भोपळा आदी भाजीपाला ४० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत.
भाजीपाल्याचे दर स्थिर
महाळाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे; परंतु आवक मंदावली असल्याने सर्वच भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. भविष्यातही भाजीपाल्याचे दर स्थिर राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
ठोक बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यातच भाजीपाल्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे दर काही प्रमाणात वाढले आहेत. बाजारात नेहमी चढ-उतार हा सुरूच असतो. - सुरेश पाटील, भाजीपाला विक्रेता.
सध्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी होत आहे. मागणी व पुरवठ्यात फरक जाणवत आहे. भाजीपाल्याची आवक वाढताच दर कमी होत असतात. शेतकऱ्यांचे नुकसान होते. - वसंत शिंदे, शेतकरी.