राज्यभर सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला व्यवसायालाही बसला आहे. मुंबईबाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाली. मात्र ग्राहकांनीही पाठ फिरविल्यामुळे गुरुवारी तोंडली, टोमॅटो, मिरचीची दरवाढ वगळता इतर भाज्यांचे दर घसरले होते.
नवी मुंबईबाजार समितीमध्ये २४ सप्टेंबरला ६२३ ट्रक टेम्पोमधून ३३९४ टन भाजीपाल्यांची आवक झाली होती. यामध्ये ५ लाख ८ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश होता. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी फक्त ५२३ वाहनांमधून २२९० टन भाजीपाल्याची आवक झाली. त्यामध्ये ४ लाख २८ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. मुंबई, नवी मुंबईमध्येही दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. गुरुवारीही मुसळधार
पावसाचा इशारा दिल्यामुळे खरेदीदारांनी बाजार समितीकडे पाठ फिरविली. यामुळे आवक कमी होऊनही बाजारभाव वाढले नाहीत. दुधी भोपळ्याचे दर प्रतिकिलो २० ते २४ रुपयांवरून १२ ते १४ झाले आहेत. फरसबी २६ ते ३० रुपयांवरून २० ते २४ झाले आहेत. काकडी १० ते २२ रुपयांवरून ६ ते ११ झाले आहेत. तोंडलीचे दर ३६ ते ५० रुपयांवरून १६ ते ४० रुपये किलो झाले.
भाज्यांचे दर (प्रति किलो)
भाजी | २४ सप्टेंबर | २६ सप्टेंबर |
बीट | १६ ते २० | १८ ते २२ |
भेंडी | १६ ते ३० | १० ते २६ |
दुधी भोपळा | २० ते २४ | १२ ते १६ |
फरसबी | २६ ते ३० | २० ते २४ |
फ्लॉवर | १६ ते ३२ | १४ ते २४ |
गवार | ४० ते ६० | ४० ते ५० |
घेवडा | ५० ते ६० | ३० ते ४० |
काकडी | १० ते २२ | ६ ते ११ |
कोबी | ८ ते १४ | ८ ते १२ |
ढोबली मिरची | ४० ते ६० | ४० ते ६० |
शेवगा शेंग | ५० ते ८० | ५० ते ८० |
दोडका | ३० ते ४० | २० ते २६ |
टोमॅटो | २० ते २८ | २२ ते ३५ |
तोंडली | ३६ ते ५० | १६ ते ४० |
वाटाणा | १०० ते १२० | ९० ते ११० |
वांगी | २० ते ३० | १६ ते २६ |
मिरची | २६ ते ५० | ४६ ते ७० |
कारली | २५ ते ३५ | १२ ते १६ |
टोमॅटो, हिरवी मिरची महागली
बीटचे दर १६ ते २० रुपये किलोवरून १८ ते २२ रुपयांवर गेले आहेत. टोमॅटोचे दरही वाढले आहेत. टोमॅटो २० ते २८ रुपयांवरून २२ ते ३५ रुपये झाले आहेत. हिरव्या मिरचीचे दर २६ ते ५० रुपयांवरून ४६ ते ७० रुपये झाले आहेत. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास भाजीपाल्याचे नुकसान होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे दरांत वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.