नाशिक : नवरात्रोत्सवात जवळपास २५ ते ३० टक्के लोकांचा उपवास असताना मागणी तशी कमीच आहे. मात्र, तसे असतानाही भाज्यांचे भाव कडाडलेलेच आहे. टोमॅटोची लाली या आठवड्यात वाढली असून, त्याचा भाव पुन्हा १०० रुपये झाला आहे. तर लसणाचा ठसका मात्र कायम आहे. याही आठवड्यात दर ४०० रुपये किलो आहे. इतर सर्वच भाज्या ८० रुपये किलोच्या वरच आहे.
गणपती उत्सव जसा सुरू झाला तशा भाज्या महागल्या. गौरी गणपतीला तर भावात अजून वाढ झाली. पितृपक्षात दर अजून वाढले. नवरात्रोत्सवात मागणी कमी असल्याने भाव उतरतील अशी आशा होती.
लाडक्या बहिणींच्या खर्चात हजाराची वाढ
पाच जणांच्या कुटुंबात महिन्याला भाज्यांसाठी जितका खर्च व्हायचा त्यात हजार ते बाराशे रुपयांची वाढ भाज्या महागल्याने झाली. त्यामुळे सामाान्य गृहिणींचे सारे बजेट कोलमडले आहे. महिला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झाल्या खऱ्या पण दुसरीकडे निसर्गाच्या अवकृपेने या लाडक्या बहिणींचे बजेट भाज्या महागल्याने कोलमडले आहे. जास्तीच्या पावसाने भाज्यांचे मोठे नुकसान झाले. आवक घटली. परिणामी, भावात प्रचंड वाढ झाली. सामान्यांचे बजेट फार बिघडले आहे.
गवार, गिलके सोडून बोला
गवार अन् गिलके गेल्या एक महिन्यापासून चांगलाच भाव खात आहे. गवार सध्या २०० तर गिलके अन् शेवगा १६० रुपये किलो आहे. त्यामुळे कितीही आवडत असले तरी गवार, गिलके सोडून बोला असे म्हणण्याची वेळ दररोज भाजीचे बजेट आखणाऱ्या गृहिणींची झाली आहे. एकीकडे भाज्या महागल्या असताना डाळींचे दरही कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे खावे तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
भाज्यांचे दर असे...
टोमॅटो - १००
भेंडी - ८०
बटाटे - ५०
कांदा - ६०
लसूण - ४००
गवार - २००
शेवगा - १६०
वांगे - ८०
कारले - ८०
गिलके - १६०
हिरवी मिरची - १००
ढोबळा मिरची - १००
कोथिंबिर जुडी - ५०
मेथी जुडी - ५०
पालक - ४०
भाज्यांचे दर अजून महिनाभर तरी कमी होणार नसल्याचे दिसते. आवक घटली आहे. स्वस्त भाजीच कोणती राहिली नाही. पितृ पक्षात भाज्यांना मागणी होती. उपवासाचे दिवस असले तरी मागणी कायम असून टोमॅटोचे भाव ४० रुपयांनी जास्त झाले. - विकास उगलमुगले, भाजीविक्रेता.