नसीम शेख
एकीकडे उन्हाचा कडाका वाढला असताना सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याचे दर बऱ्याच प्रमाणात खाली पडलेले दिसले. मात्र हिरव्या मिरचीचे दर वाढलेलेच असल्याने अद्याप ही मिरची सामान्यांसाठी तिखटच आहे.
जालना जिल्ह्यात टेंभुर्णीच्या आठवडी बाजारात सोमवारी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आला होता. उन्हाळा असतानाही बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या विहिरीत असलेल्या थोड्याफार पाण्यावर प्रत्येक शेतकरी थोडा बहुत भाजीपाला काढत असतो. यामुळे या दिवसात अचानकपणे भाजीपाल्याच्या उत्पन्नात वाढ होते, असे जाणकारांनी सांगितले.
बाजारात टोमॅटो, वांगी, शेवगा, गोबी, भाजीपाला मुबलक प्रमाणात आल्याने टोमॅटो १० रुपये किलोप्रमाणे तर वांगी २० रुपये किलोने विकली गेली. गोबी व शेवगा ही ३० रुपये किलोप्रमाणे विकला गेला. हिरव्या मिरचीचे दर अद्याप वाढलेलेच असून बाजारात मिरची ८० ते १२० रुपये किलोप्रमाणे विकल्या गेली.
अन्य भाजीपाल्यात कोथिंबीर-५ रुपये जुडी, शेपू १० रुपये जुडी, मेथी १० रुपये जुडी, पालक- ५ रू. जुडी, दोडकी-४० रू. किलो असा दर दिसून आला. बाजारात लिंबू दुर्मिळ असल्याने त्याचे दर १६० रु. किलोप्रमाणे दिसून आले.
हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?
कांदा, लसूण, अद्रक स्थिर
• मागील काही आठवड्यापासून कांदा लसूण आणि अदकीचे दर जैसे थे तसेच दिसून आले.
• बाजारात कांदा-२५ रुपये किलो, लसूण (बारीक)- १२० रुपये किलो, अदक १०० रुपये किलोप्रमाणे विकले गेले.
टरबूज, खरबूज, काकडी ही स्वस्त
या वर्षी परिसरातील अनेक तलाव उन्हाळ्याच्या तोंडावर आटल्याने अनेक शेतकऱ्यांनी या तलावात टरबूज, खरबूज आणि काकडीची लागवड केली आहे. त्यामुळे सध्या बाजारात या फळांची आवक वाढली आहे. बाजारात टरबूज १० रुपये, खरबूज व काकडी - २० रुपये किलोप्रमाणे विकल्या गेले.