Join us

Vegetables Market : अतिवृष्टीमुळे बाजारातून पालक शेपू, मेथी गायब; मात्र कोथिंबीर तोऱ्यात उभी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 5:27 PM

आता दसरा-दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. किरकोळ बाजारात काय मिळतोय भाव वाचा सविस्तर (Vegetables Market)

Vegetables Market :

मंठा :

मागील दोन महिन्यांपासून कांदा व लसणाचे दर सातत्याने वाढत आहेत. आता दसरा-दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. परंतु, अतिवृष्टीमुळे पालक, शेपू, मेथी, आंबटचुका आदी पालेभाज्याबाजारातून गायब झाल्या असून, कोथिंबीरीचाही भाव तोऱ्यात आहे.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चटका बसत आहे. सध्या कांदे ५० ते ६० रुपये किलो आणि लसूण ३०० ते ३५० रुपये किलो दराने विक्री केला जात आहे.

मागील वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे एप्रिलपासून भाजीपाल्याच्या दरात मोठी भाववाढ होत होती.

तर विहिरींची पाणी पातळी तळाला गेल्याने मोजक्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली होती. परंतु, मेच्या शेवटी शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड करण्यासाठी भाजीपाल्याची झाडे काढून शेत रिकामे करून खरीप व नवीन भाजीपाल्याची लागवड केली.

त्यामुळे मे, जून, जुलै हे तीन महिने लसूण, कांदा वगळता भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले. आताही भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

भाजीपाल्याचे मोठे नुकसान१. महिनाभरापूर्वी बाजारात नवीन भाजीपाल्याची आवक सुरू झाल्याने भाजीपाल्याचे दर कमी होत होते. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीला अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात भाववाढ झाली आहे.

२. आता बाजारात लसूण व कांद्याची आवक कमी आल्याने भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कांदा, लसूण, पालक, शेपू, कोथिंबीर या भाज्या वगळता इतर भाजीपाल्याचे दर काहीसे स्थिर असल्याचे दिसून येत आहेत.

अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट

• जून महिन्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी नवीन भाजीपाल्याची लागवड केली होती. परंतु, अवकाळी पावसामुळे त्यावर पाणी फिरल्याने उत्पादनात घट झाली.

• परिणामी, भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

असे आहेत भाजीपाल्याचे दर

भाजीदर
फुलकोबी४०
शिमला मिरची४०
वांगी४०
टोमॅटो२०
कारले४०
दोडके४०
हिरवी मिरची४०
बटाटा३०
कांदा५०
भेंडी२०
शेवगा६०
कोथिंबीर२००
टॅग्स :शेती क्षेत्रभाज्याबाजारजालनाशेतकरीशेती