पुणे : 'शेतकऱ्यांना कुणीच वाली नाही. शेतकऱ्यांना हा माल पिकवण्यासाठी मजुरी सुद्धा परवडत नाही. अशी पद्धत असते का? व्यापाऱ्यांनी एकी करून शेतकऱ्यांचे नुकसान चालवले आहे.' असं म्हणत मार्केटमध्ये आलेल्या शेतकऱ्यांनी विक्री करण्यासाठी आणलेला माल मार्केट यार्ड परिसरातच फेकून दिलाय. ही घटना जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे घडली असल्याची माहिती असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, व्यापाऱ्यांनी लिलावासाठी हजेरी न लावल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत शेतमाल मार्केट यार्डातच ओतून दिला. या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा संताप दिसत असून दोन गाड्यातील शेतकरी टोमॅटो ओतून देताना दिसत आहेत. इतर शेतकरी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत पण शेतकरी संतापाने टोमॅटो गाडीखाली फेकून देताना दिसत आहेत.
शेतकऱ्याचा संताप
'साडेनऊला मार्केट सुरू होते पण अद्याप व्यापारी मार्केटमध्ये आलेले नाहीत. व्यापाऱ्यांना फुकट खाण्याची सवय लागली आहे. आम्ही एवढे कष्ट करून माल पिकवतो. आम्हाला माल जास्त होतोय म्हणून मार्केटला आणत नाही. शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही. शेतकऱ्यांना हा माल पिकवण्यासाठी मजुरी सुद्धा परवडत नाही. अशी पद्धत असते का? व्यापाऱ्यांनी एकी करून शेतकऱ्यांचे नुकसान चालवले आहे.' अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडलीये.
नाशिक जिल्ह्यांत मागच्या काही दिवसांपासून व्यापारी, हमाल, तोलाऱ्यांच्या मागण्यांवरून लिलाव बंद ठेवण्यात आले होते. पण शेतकरी आंदोलकांच्या पुढाकाराने हे लिलाव सुरू झाले आहेत. पण जुन्नर येथील नारायणगाव येथील बाजार समितीमधील व्यापारी वेळेवर लिलावासाठी न आल्याने हा शेतमाल शेतकऱ्यांना संतापाने फेकून दिल्याचं व्हिडिओमधून स्पष्ट होतंय. पण यासंदर्भातील अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.