Join us

वाशिमचा संत्रा हैदराबादला; ब्रोकोली जाते दिल्लीला ! कसे जातात ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 6:12 PM

आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रयोगशिलतेची कास धरत आर्थिक उन्नती साधली आहे. आता शेतकरी आपला माल परराज्यात पाठवत आहेत. कसे ते वाचा सविस्तर

सुनील काकडे

आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रयोगशिलतेची कास धरत आर्थिक उन्नती साधली आहे. जिल्ह्यातील संत्रा हैदराबाद, बंगळुरूसह बांग्लादेशात जाते तर ब्रोकोली थेट दिल्लीच्या मार्केटपर्यंत पोहोचली आहे.

काट्याचे अनिल मालपाणी, मुंगळ्याचे गजानन राऊत हे अन्य शेतकऱ्यांना सोबत घेऊन हैदराबादेतील 'कोल्ड स्टोरेज' मध्ये संत्रा साठवून ठेवतात. सावरगाव जिरे येथील शेतकरी त्यांच्या मिरची आणि टोमॅटोची सुरत (गुजरात) येथे विक्री करत आहेत. 

टो येथील शेतकरी शिवाजी बोरकर हे बारमाही मिरचीचे उत्पादन घेत असून, तेलंगणा, गुजरात या राज्यासह महाराष्ट्रातील मुंबईत त्याची विक्री केली जाते. शिरपूर येथील गजानन वानखेडे यांनी ब्रोकोलीचे उत्पादन घेऊन त्याची स्थानिक बाजारपेठेत विक्री न करता दिल्लीच्याबाजारात विक्री करत असल्याचे कृषि विभागाने सांगितले.

चिया सिड्सची मध्य प्रदेशात विक्री

कोंडाळा झामरे येथील प्रयोगशील शेतकरी गुणाजी इंगोले यांनी गेल्या दोन वर्षात चिया सिड्सचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली. त्यातील दोन टन चिया सिड्सची त्यांनी निमज (मध्यप्रदेश) येथे विक्री केल्याचे त्यांनी सांगितले.

काही प्रयोगशील शेतकरी वाशिम जिल्हाच नव्हे तर, नागपूर, अमरावती विभागासह महाराष्ट्रात व परप्रांतातही त्यांच्या मालाची विक्री करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. -आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :शेती क्षेत्रबाजार समिती वाशिमबाजारहैदराबाददिल्ली