अनिलकुमार मेहेत्रे
पाचोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मोसंबी मार्केटमध्ये मृग बहार मोसंबीची यंदा आवक कमी आहे. त्यात दरही गतवर्षीच्या तुलनेत ४ हजार रुपयांनी कमी असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजारपेठेतील उलाढालही ५० टक्क्यांनी घटली आहे.
पैठण तालुक्यातील पाचोड येथे कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारातील मोसंबी मार्केट गेल्या काही वर्षांत चांगलेच नावारूपाला आले आहे. येथे परिसरातील शेतकरी आंबा बहारमधील मोसंबी व मृग बहारमधील मोसंबी मोठ्या प्रामाणात विक्रीसाठी आणतात. त्यामुळे येथे खरेदीसाठी मुंबई, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कलकत्ता, बिहार, दिल्ली आदी भागांतील व्यापारी नियमित येतात.
गतवर्षी पाचोड व परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी, या भागातील मोसंबीच्या बागांना देण्यासाठी पाणीच नाही. अशात दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढू लागला आहे. त्यामुळे मोसंबीच्या बागा सुकू लागल्या आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते, त्यांनी जगविलेल्या बागांमधील फळांची तोडणी सुरू झाली असून, पाचोडच्या मार्केटमध्ये मृग बहार मोसंबीची आवक सुरू झाली आहे. परंतु गतवर्षीच्या तुलनेत ही आवक कमीच आहे. आवक कमी असताना दर चांगला मिळणे अपेक्षित असताना तसेही होताना दिसत नाही, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊसाच्या उत्पादनाचा ब्रॅंड
मोठ्या शहरांमधून मागणी कमी
• मोठ्या शहरांमधील मार्केटमध्ये मागणी कमी असल्याने पाचोडच्या बाजारात मृग बहार मोसंबीला प्रतिटन १४ हजार रुपयांचा दर मिळत आहे. एकदम चांगल्या प्रतीच्या मोसंबीला मात्र १८ हजार रुपये प्रतिटन दर मिळत आहे. रविवारी येथील बाजारात १२५ ते १५० टन मोसंबी विक्रीसाठी आली होती.
• मागील वर्षी मार्च महिन्यात मृग बहार मोसंबीला २० ते २५ हजार रुपये प्रतिटन वर मिळत होता.
• विशेष म्हणजे मागील वर्षी यावेळेला पाचोडच्या मोसंबी मार्केटमध्ये ५० लाख रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी मात्र २० ते २५ लाख रुपयांचीच उलाढाल झाली आहे.
१४ ते १८ हजार रुपये दर
पाचोड येथील मोसंबी मार्केटमध्ये सध्या मोसंबीची आवक कमीच आहे. रविवारी झालेल्या लिलावात मोसंबीला १४ ते १८ हजार रुपये प्रतिटन असा दर मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत हा दर कमीच आहे. - शिवाजी भालसिंगे, मोसंबीचे व्यापारी