पावसाळ्याच्या दिवसात उगवणाऱ्या रानभाज्या आरोग्यासाठी गुणकारी असतात. सध्या या रानभाज्या वसमतच्या भाजीमंडईत विक्रीसाठी दाखल होत असून, नागरिकांची त्याला पसंती मिळत आहे.
यामध्ये करटुल्यांना दोनशे रुपयांवर भाव मिळत आहे. सध्या भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य माणसाला भाजीपाला विकत घेणे परवडेनासे झाले आहे.
अशावेळी ग्रामीण भागात आढळणारी करटुले ही रानभाजी चांगलाच भाव खाऊन जात आहे. कारल्याशी साधर्म्य असणारी करटुले ही रानभाजी कारल्यासारखीच वेलवर्गीय आहे.
वेगवेगळ्या भागात या करटुलेंना विविध नावाने ओळखले जाते; मात्र तालुक्यात या रानभाजीला 'करटुले' या नावानेच ओळखले जाते. आठवडे बाजार व भाजी मंडईत सध्या दोनशे रुपये प्रतिकिलोने विक्री सुरू आहे.
काही ठिकाणी या रानभाजीचे व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन घेण्यात येत असले तरी, या उत्पादित करटुलेपेक्षा शेतात आणि माळरानात खडकाळ भागात नैसर्गिकरीत्या उगवलेल्या वेलांमधून जे करटुले मिळतात. त्या करटुलेंना ग्राहक व खवय्यांची मोठी पसंती असते.
तालुक्यात तुरळक प्रमाणात करटुले शेतात मिळतात. शेतकरी शेतात गेले की भाजीपुरते करटुले घरी आणून करटुलेच्या रसरशीत भाजीवर ताव मारीत आहेत.
डोंगराळ भागातील शेतकरी या करटुलेची लागवड करीत नाही. पाऊस पडला की, ते आपोआप उगवतात. करटुलेची वेल साधारणतः पावसाळ्याच्या दिवसात चांगला पाऊस पडल्यानंतर विशेषतः श्रावण महिन्यात त्याच्या कंदामधून उगवते.
अगदी महिनाभरातच ती फुलावर येते आणि फळधारणेस सुरुवात होते. अवघ्या सात-आठ दिवसांतच करटुले फळ चांगल्या मोठ्या लिंबू एवढ्या आकाराचा झाला की, ते खाण्यासाठी योग्य समजून तोडले जाते. अनेक प्रकारच्या आजारांवर गुणकारी म्हणून करटुलेच्या भाजीचे आहारात सेवन केले जाते.
करटुले होतेय दुर्मिळ
■ पावसाळ्याच्या दिवसांत शेतातील बांधावर, काटेरी झुडपात करटुल्यांचा वेल दिसून येतात. करटुले शोधण्यासाठी ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिक शेतात प्रसंगी जंगलातही जातात.
■ सद्यस्थितीत बाजारात करटुलेची मोठी मागणी असल्याने अनेकजण विक्रीसाठी आठवडे बाजारात घेऊन जातात.
■ सध्या करटुलेला भावही बऱ्यापैकी मिळत आहे; मात्र तणनाशक फवारणीमुळे शेतातील बांधावरील करटूले आता दुर्मीळ होत चालले आहेत.
■ तणनाशक फवारणीमुळे करटुलेंची वेल करपून जात आहे.